स्टेट बँक, भारती एअरटेल आघाडीवर : सेन्सेक्स 721 अंकांनी राहिला तेजीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहा पैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 18,328 कोटी रुपयांनी मागच्या आठवड्यामध्ये वाढलेले पाहायला मिळाले आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल या कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढलेले पाहायला मिळाले.
मागच्या आठवड्यात पाहता मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 721 अंकांनी म्हणजेच 0.88 टक्के इतका वाढला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ झालेली दिसून आली. तर दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात कमालीचे घटलेले पाहायला मिळाले.
यांच्या बाजार मूल्यात वाढ
प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 35,953 कोटी रुपयांनी वाढत 7,95,910 कोटी रुपयांवर तर भारती एअरटेलचे बाजारमूल्य 33, 214 कोटी रुपयांनी वाढत 11,18,952 कोटी रुपयांवर पोहोचले होते. याच पद्धतीने रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 17,389 कोटी रुपयांनी वाढत 19,04,898 कोटी रुपयांवर तर आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 12,952 कोटी रुपयांनी वाढत 11,46,879 कोटी रुपयांवर पोहोचले होते. जीवन विमा क्षेत्रातील कंपनी एलआयसीचे बाजार मूल्य 12460 कोटींसह वाढत 5,65,612 कोटींवर तर आणखी एक आयटी कंपनी इन्फोसिसचे बाजार मूल्य 6,127 कोटींनी वाढत 6,39,901 कोटींवर पोहोचले होते.
यांच्या बाजार मूल्यात घसरण
यादरम्यान आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 10,707 कोटींनी घसरत 10,01,654 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. याचबरोबर बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 6,346 कोटी रुपयांनी कमी होत 6,17,892 कोटी रुपयांवर आणि हिंदुस्थान युनिलीवरचे बाजार भांडवल मूल्य 5039कोटी रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळाले.









