सेन्सेक्स होता 863 अंकांनी नुकसानीत : टीसीएसचे मूल्य सर्वाधिक तोट्यात : एचडीएफसी बँक, रिलायन्सचे मूल्य वाढले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहा पैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 1 लाख 35 हजार कोटी रुपयांनी कमी झाले होते. यामध्ये सर्वाधिक नुकसानीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी होती.
बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 863 अंकांनी किंवा 1.05 टक्का इतका घसरणीत राहिला होता. टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बजाज फायनान्स यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये घसरण झालेली दिसून आली. दुसरीकडे बाजार मूल्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे तसेच एचडीएफसी बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मात्र मागच्या आठवड्यात वाढलेले दिसून आले. या तीनही कंपन्यांनी सदरच्या आठवड्यात आपल्या बाजार भांडवल मूल्यामध्ये एकत्रित 39 हजार 989 कोटी रुपयांची भर घातली होती.
यांच्या मूल्यात घसरण
टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 47,487 कोटी रुपयांनी कमी होत 10,86,547 कोटी रुपयांवर तर भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 29,936 कोटी रुपयांनी कमी होत 10,74,903 कोटी रुपयांवर राहिले होते. बजाज फायनान्सचे बाजार मूल्य 22,806 कोटींनी कमी होत 5,44,962 कोटी रुपयांवर आणि आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 18, 694 कोटी रुपयांनी कमी होत 6,10,927 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 11,584 कोटी रुपयांनी कमी होत 7,32,864 कोटी रुपयांवर स्थिरावले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 3608 कोटींनी कमी होत 10,50,215 कोटी रुपयांवर आणि एलआयसीचे बाजार मूल्य 1233 कोटी रुपयांनी कमी होत 5,59,509 कोटी रुपयांवर घसरले होते.
यांच्या मुल्यात वाढ
दुसरीकडे एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 5946 कोटींनी वाढत 15,44,025 कोटी रुपयांवर पोहोचले तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 2029 कोटी रुपयांनी वाढत 18,85,885 कोटी रुपयांवर पोहोचले होते.









