वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आघाडीवरच्या दहा पैकी पाच कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 60,675 कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक यांच्या बाजार भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली.
मागच्या आठवड्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी शेअर बाजाराला स्वातंत्र्यदिनाची सुट्टी होती, त्यामुळे चारच दिवस बाजाराचे काम झाले. यादरम्यान मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 739 अंकांनी म्हणजेच 0.92 टक्के इतका वाढत बंद झाला तर निफ्टी 268 अंकांनी वाढत बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इन्फोसिस यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ झाली होती. दुसरीकडे टीसीएस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एलआयसी आणि बजाज फायनान्स यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये घसरण पाहायला मिळाली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 20,445 कोटी रुपयांची वाढ होऊन भांडवल 7,63,095 कोटी रुपयांवर पोहोचले होते. याचप्रमाणे एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 14,083 कोटी रुपयांनी वाढत 15,28,387 कोटी रुपयांवर पोहोचले होते. इन्फोसिसचे बाजारमूल्य 9887 कोटी रुपयांनी वाढत 6,01,310 कोटी रुपयांवर पोहोचले. भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 8410 कोटी रुपयांनी वाढत 10,68,260 कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्सच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 7848 कोटी रुपयांची वाढ होत ते 18,59,023 कोटी रुपयांवर पोहोचले.
यांच्या मूल्यात घट
एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 15,306 कोटी रुपयांनी कमी होत 5,61,881 कोटी रुपयांवर आणि आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 6513 कोटी रुपयांनी कमी होत 10,18,982 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 9601 कोटी रुपयांनी कमी होत 5,35,547 कोटी रुपयांवर राहिले होते.









