सेन्सेक्स 409 अंकांनी तेजीत : टाटा स्टील समभाग चमकला
वृत्तसंस्था / मुंबई
धातू निर्देशांकाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय शेअर बाजार बुधवारी तेजीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 409 अंकांनी वधारत बंद झाला. टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक वधारलेला होता. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 409 अंकांनी वाढत 80567 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 135 अंकांच्या तेजीसह 24715 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकानेही चांगली कामगिरी केलेली दिसून आली व दिवसअखेर 406 अंकांनी वाढत 54067 च्या स्तरावर बंद झाला.
ऑटो, फार्मा निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले. फार्मा निर्देशांकात पिरॅमल, ग्लेनमार्कचे समभाग चमकले. जीएसटी कपातीच्या पार्श्वभूमीवर ऑटो निर्देशांकही तेजीत होता. बुधवारी निफ्टीत टाटा स्टील 5.97 टक्के, हिंडाल्को 3.05 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 2.70 टक्के, कोल इंडिया 2.55 टक्के व इंडसइंड बँक 2.25 टक्के इतका वाढत बंद झाला होता. घसरणीचा विचार करता इन्फोसिस 1.31 टक्के, एचडीएफसी लाइफ 0.80 टक्के, एनटीपीसी 0.61 टक्के, विप्रो 0.55 टक्के व नेस्ले इंडियाचे समभाग 0.51 टक्के घसरणीसोबत बंद झाले.
सेन्सेक्समध्ये टायटन 1.93 टक्के, महिंद्रा आणि महिंद्रा 1.59 टक्के व आयटीसीचे समभाग 1.23 टक्के वाढत बंद झाले. सेन्सेक्समध्ये एचयुएल 0.46 टक्के, टीसीएसचे समभाग 0.45 टक्के घसरत बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.63 टक्के वाढत तर स्मॉलकॅप 0.90 टक्के वाढत बंद झाला. याचदरम्यान बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 450 लाख कोटी रुपयांहून 453 लाख कोटी रुपयांवर पोहचले. म्हणजेच एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 3 लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
निर्देशांकांची कामगिरी
विविध निर्देशांकांचा विचार करता धातू निर्देशांकाची कामगिरी उठून दिसणारी ठरली. यानंतर निफ्टी कमोडिटीज 1.15 टक्के, फार्मा 1.10 टक्के तेजीत होता.









