महाबळेश्वर :
बाजारपेठ सुशोभिकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. आज या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे व स्थानिक उध्दव ठाकरे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व दुकानदार यांनी केली. हे काम एप्रिल अखेर पूर्ण होईल असा विश्वास श्री. देशपांडे यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या निधीतुन बाजारपेठेच्या सुशोभिकरणाचे काम गेली तीन वर्षापुर्वीच सुरू करण्यात आले होते. पंरतु या कामात अनेक अडचणी आल्याने हे काम रेंगाळले. कामाचा दर्जा आणि वेग राखता न आल्याने शहरातील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी पाहता पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मोठा निर्णय घेतला. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले तर या कामाच्या ठेकेदाराकडुन काम काढून घेवुन ते काम पुन्हा निविदा काढुन नव्या ठेकेदाराकडे काम देण्यात आले. सर्व सोपस्कार पूर्ण करून हे काम एक आठवड्या पूर्वी सुरू करण्यात आले आहे.
आता या कामाने चांगलाच वेग पकडला असुन या कामाची पाहणी आज करण्यात आली. यावेळी अधिकारी अजय देशपांडे, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, शहर प्रमुख महेश गुजरे, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, राष्ट्रवादीचे अॅड. संजय जंगम, शंतनु बगाडे, संजय जोडकर, अमोल साळुंखे, शुभम कुंभारदरे आदी दुकानदार यावेळी उपस्थित होते.
रस्त्याच्या एका बाजुच्या गटाराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच वेळी रस्त्यावर बीबीएम टाकण्याचे काम सुरू केले आहे. बीबीएमनंतर पीसीसी होवुन त्यावर काळा दगड बसविण्यात येणार आहे. पीसीसी झाल्यावर उरलेल्या बाजुच्या गटाराचे काम देखील सुरू करण्यात येणार आहे. हे काम महावळेश्वर महापर्यटन महोत्सवापूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती यावेळी देशपांडे यांनी दुकानदारांना दिली.
या कामाबावत दुकारदारांसोबत चर्चा केली असता सर्वांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले. दुकानदार व पर्यटक यांना या कामाचा कोणताही त्रास होत नाही उलट हे काम झाल्यावर शहराच्या पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढच होणार असल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे.
बाजारपेठेतील काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन पुढील १२५ मीटर रस्त्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यापर्यंतच्या टप्प्याचे काम सुरू केले आहे असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले
- सुशोभिकरणामुळे महाबळेश्वरचे पर्यटन वाढणार
अनेक देश पर्यटनावर चालत आहे परंतु आपल्याकडे पर्यटनाला राज्य सरकार विशेष महत्व देत नाही, परंतु उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा महाबळेश्वर भेटीवर आले होते. तेव्हा त्यांनी बाजारपेठेची अवस्था पाहुन सुशोभिकरणाचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी पर्यटन विभागाला आराखडा तयार करण्यास सांगुन १०० कोटी रूपये या कामासाठी मंजुर केले. सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर महाबळेश्वरच्या सौंदर्याने नक्कीच भर पडणार असून या सुशोभिकरणामुळे मोठ्या प्रमाणावर महाबळेश्वरला पर्यटक येतील.
राजेश कुंभारदरे माजी जिल्हाप्रमुख, सेना








