ऊस-भात पिकात पाणी, शेतकऱ्यांच्या मनात धडकी
बेळगाव : मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे नदी-नाले, तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. विशेषत: मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पाणी पात्राबाहेर पडले असल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील दोन वर्षात मार्कंडेयच्या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदादेखील पाणीपातळी वाढल्यानंतर चिंता व्यक्त होऊ लागली आहे. यंदा वळीव आणि मान्सून म्हणावा तसा बरसला नव्हता. त्यामुळे पाऊस होणार की नाही? याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र, जुलैच्या पंधरवड्यानंतर पावसाने दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. नदी, नाले आणि तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नाल्यांनादेखील मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू झाल्याने मार्कंडेय नदीची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या ऊस, भात आणि इतर पिकांत देखील पाणी शिरले आहे. येत्या दिवसात दमदार पाऊस सुरूच राहिल्यास पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मार्कंडेय नदीच्या पुरामुळे 2019 ला मोठा फटका बसला होता. त्यानंतर 2020 ला देखील रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे ऊस, भात आणि इतर पिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी नदीकाठावर ऊसपीक घेणेच पसंत केले आहे. विशेषत: भातशेतीला मोठा फटका बसला होता. यंदा उन्हाळ्यात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने मार्कंडेय कोरडी पडली होती. जुलै पहिल्या पंधरवड्यात देखील मार्कंडेयला पाणी नव्हते. मात्र, आता चार दिवसात दुथडी भरून वाहताना दिसू लागली आहे. तर काही ठिकाणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून पिकांमध्ये शिरले आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढू लागली आहे. दरम्यान, पिकांमधील पाणी लवकर ओसरले नाही तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.









