शेतकऱ्यांना चिंता : तलाव-नदी-नाले तुडुंब
बेळगाव : मागील चार दिवसापासून झालेल्या दमदार पावसामुळे नदी, नाले, तलाव आणि जलाशयांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठावरील पिकांना धोका निर्माण झाला आहे. विशेषत: मार्कंडेय नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली असून पाणी पात्राबाहेर पडले आहे. काही ठिकाणी नदीकाठी असलेले पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. मागील दोन-तीन वर्षात मार्कंडेय नदीला पूर येऊन नदीकाठी पिकांना मोठा फटका बसला होता. तब्बल आठ दहा दिवस पिके पाण्याखाली राहिल्याने कुजून गेली होती. यंदादेखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये धडकी भरली आहे. जुलै पहिल्या पंधरवड्यात नदी कोरडी होती. मात्र केवळ चार दिवसात झालेल्या पावसाने तुडुंब भरून वाहू लागली आहे. विशेषत: नाल्यांच्या प्रवाहातही वाढ झाल्याने नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे.
नदीकाठावर पाणी आल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ
उचगाव, कल्लेहोळ, बाची, तुरमुरी, आंबेवाडी, मण्णूर, अलतगा, कंग्राळी, गौंडवाड आदी भागातील भात शेतीत पाणी शिरले आहे. काही शेतकऱ्यांनी भातरोप लागवडीसाठी पेरणी केली आहे. मात्र या भातशेतीमध्ये पाणी साचून राहिल्याचे दिसत आहे. शिवाय नदीकाठावर पाणी असल्याने रोप लागवडीची कामेदेखील खोळंबली आहेत. गतवर्षी नदीकाठावर पूर येऊन पिके कुजून गेली होती. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी दुबार लागवड केली होती. काही शेतकऱ्यांची जमीन पिकाविना पडून राहिली होती. यंदादेखील नदीकाठावर पाणी आल्याने नागरिकांची चिंता वाढू लागली आहे.









