अविनाश पोतदार पॅनेलला निवडून आणण्याचा निर्धार
वार्ताहर/ काकती
काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पदासाठी रविवार दि. 27 रोजी कारखान्याच्या कार्यस्थळावर मतदान होणार आहे. शेतकरी बचाव म्हणून शेतकरी बांधवांची गरिबी हटणार नाही. साखर कारखान्यातील जागतिक बदलाचा सातत्याने अभ्यास करून कारखाना चालवावा लागणार आहे. मावळते चेअरमन अविनाश पोतदार साखर कारखान्याचे अभ्यासक आहेत. त्यांच्या सूचनेनुसार परिश्रम घेणारे संचालक मंडळ तालुक्यातील उसाचे उद्दिष्ट गाठणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या पदरात त्यांच्या श्रमाचे आर्थिक यश मिळणार आहे, असा विश्वास शेतकरी बांधवात निर्माण झाला. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अविनाश पोतदार पॅनेल गटाला निवडून आणण्याचा निर्धार केला.
प्रचार सभेतून शेतकऱ्यांना विश्वास देताना अविनाश पोतदार म्हणाले, कारखाना फायद्यात चालण्यासाठी केवळ भांडवल असून चालणार नाही. व्यवस्थापनातील पारदर्शकता, काटकसर, तालुक्यातील उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सुविधा, मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. यंदा तालुक्यात 1550 हेक्टरात अधिक उसाची लागवड झाली असून खोडवा ऊस 7692 हेक्टरात आहे. याचा सर्व्हे केला आहे. याकरिता शेतकऱ्यांनी आपला ऊस हक्काच्या कारखान्यात पाठवून द्यावा.
शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या वाजवी मोबदल्याची किमत म्हणजेच एफआरपी ठरल्यानंतर उसाचा उतारा किती निघेल यावर आधारभूत किंमत वाढविणे अपेक्षित असते. म्हणजे 9 टक्क्यापेक्षा जास्त उतारा येत असेल तर पुढच्या प्रत्येक वाढीव टक्क्यासाठी वाढवून देणे परवडते. यासाठी चांगल्या गुणवत्तेचा ऊस असावा लागतो. तर काहीवेळा जागतिक बाजारपेठेत साखरेचे काय दर आहेत. यावरही देशातल्या साखरेच्या किंमती अवलंबून असतात.
साखर निर्मिती करताना प्रति खर्च निघत नसल्यास तफावत येऊ शकते. तेव्हा इथेनॉलची निर्मिती करावी लागते. यंत्र सामग्री, सरकारची परवानगी अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सरकारने साखर दर नियंत्रण मुक्त केल्याने साखरेचे दर घसरतात. कारखानदारीला 80 टक्के उत्पन्न साखरेच्या विक्रीतून मिळते. असे अनेक अनुभव प्रचार दौऱ्यात अविनाश पोतदार यांनी शेतकऱ्यांना समजावून दिले. यामुळे केवळ संचालक पदावर राहून मोठेपणा मिळविण्यापेक्षा अभ्यास आणि परिश्रम घ्यावे लागतात. यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी अविनाश पोतदार पॅनेलला बहुमताने निवडून देण्याचा निर्धार केला आहे.









