पाऊस पुन्हा सक्रिय : नदीकाठावरील शेतकऱ्यांमध्ये धाकधूक कायम
बेळगाव : मागील दोन दिवसापासून पुन्हा पाऊस अधिक सक्रिय झाल्याने मार्कंडेयच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवाय पाऊस कायम राहिल्यास नदी काठावरील पिकांना धोका उद्भवण्याची चिंता व्यक्त होऊ लागली आहे. यंदा जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पूर येऊन नदी काठावरील हजारो एकर क्षेत्रातील पिकांना फटका बसला होता. त्यानंतर पाऊस ओसरल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नदी काठावरील शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार आतापर्यंत अपेक्षेपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. शिवाय येत्या दोन-तीन दिवसात अधिक पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर वाढवला आहे. त्यामुळे नाले आणि शिवारात पाणीच पाणी झाले आहे. पुन्हा एकदा नाले अधिक प्रमाणात प्रवाहित झाल्याने मार्कंडेयच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
…तर पुन्हा पूर येण्याची शक्यता
जुलै मध्यानंतर झालेल्या जोरदार पावसाने नदी काठावर पिकांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे भात आणि इतर पिके कुजून गेली होती. मागील 15 दिवसात नदी काठावर दुबार भात लागवड करण्यात आली आहे. शिवाय आता पुन्हा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा नदी काठावर पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार लागवड केलेल्या भात नुकसानीची चिंता लागली आहे.
शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट
जुलै महिन्यात अधिक पाऊस झाल्याने राकसकोप जलाशयही पूर्णपणे भरले होते. शिवाय अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत करण्यात आला होता. परिणामी नदी काठावर 15 दिवस पूर कायम होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने पूर ओसरला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. या काळात नदी काठावर दुबार भात लागवड करण्यात आली आहे. मात्र पुन्हा पावसाने जोर घेतल्याने नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे.









