नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीतील नदीकाठाचा भाग जलमय
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीच्या पात्राबाहेर पाणी गेल्याने पुन्हा एकदा महापूर आला आहे. नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीतील नदीकाठाचा भाग पुन्हा एकदा जलमय झाला असून शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. शिवाय या भागातील असलेल्या अनेक नाल्यांनाही पूर आल्याने या पुराचे पाणी सभोवतालच्या शेतवडीत शिरले आहे. गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण पश्चिम भागात मुसळधार आणि संततधार पावसाला जोर आल्याने आणि या संपूर्ण भागातील नदीच्या पात्राच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर पाणलोट क्षेत्रातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात जमा होत गेल्याने तसेच राकसकोप धरणातील जादा पाणीसाठा सोडण्यासाठी राकसकोप धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
परिणामी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत गेल्याने या भागातील शेतवडीत आता पाणी शिरले आहे. नदीच्या दुतर्फा हजारो एकर जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी भाताच्या रोप लागवडीसाठी म्हणून जवळपास तीन ते चारवेळा भाताची पेरणी केली होती. मात्र चालवर्षी मे महिन्यापासूनच पावसाने जोर केल्याने आणि जून, जुलैमध्ये अतिवृष्टी झाल्याने पेरणी केलेली पूर्ण बियाणे कुजून खराब झाली होती. यानंतर पुन्हा भाताची रोपे लागवड करून आता ती चांगल्या स्थितीत असताना पुन्हा एकदा पावसाने जोर केला आहे. याबरोबरच ऊस व इतर काही मिरची, भाजीपाला देखील या नदीकाठाला असून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. जर पाणी असेच राहिले तर पिके कुजून नुकसान होण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. नदीकाठचा सर्व भाग आता जलमय झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. नदीच्या पात्रातील पाण्याने आता जोर घेतला आहे. रात्री व दिवसा उसंत न घेता संततधार पावसाच्या धारा कोसळत आहेत.
पावसाची संततधार, मात्र शेतकरी शेतात
पावसाची संततधार सुरू आहे. मात्र शेतातील हंगाम साधण्यासाठी शेतकरी माळ जमिनीत शेतवडीतच दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकरी वर्गासाठी हंगाम म्हणजे एक पर्वणीच असल्याने शेतकरी घरी न बसता शेतातील कामात गुंतल्याचे पहावयास मिळत आहे. एकंदरीत पाहता यावर्षी शेतकऱ्यांना शेतीचा खरीप हंगाम साधण्यासाठी शेतकरी माळजमिनीमध्ये भुईमूग, बटाटे, मिरची, जोंधळा, कुळीथ, सूर्यफूल व इतर भाजीपाला या पिकाच्या मशागतीची कामे जोरदार असल्याचे चित्र दिसून येत आहे.









