हजारो एकर नदीकाठचा भाग जलमय : शेतीतील पिके पाण्याखाली : अनेक नालेही तुडुंब
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडल्याने या भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला महापूर आला आहे. त्यामुळे नदीकाठचा भाग जलमय झाला आहे. शेतीतील कोवळी पिके पाण्याखाली गेली आहेत. शिवाय या भागातील अनेक नाल्यांनाही पूर आल्याने पुराचे पाणी शेतवडीत शिरले आहे. पश्चिम भागात मुसळधार पावसाला जोर आल्याने आणि नदीपात्राच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर पाणलोट क्षेत्रातील पाणी मार्कंडेय नदीपात्रात जमा झाल्याने तसेच राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी नदीपात्रात पाणीपातळी वाढल्याने या भागातील शेतवडीत पाणी शिरले आहे. नदीच्या दुतर्फा शेतकऱ्यांनी भात रोप लागवडीसाठी जवळपास दोन ते तीन वेळा भाताची पेरणी केली होती. मात्र मे महिन्यापासूनच पावसाने जोर केल्याने आणि जून, जुलैमध्ये अतिवृष्टी झाल्याने पेरणी केलेली पूर्ण बियाणे कुजून खराब झाली आहेत. शेतवडीत केलेल्या बियाणांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांनी माळ जमिनीमध्ये भाताच्या बियाणांची पुन्हा पेरणी केली. मात्र पावसाचा जोर कायमच राहिल्याने या बियाणांचेही सध्या काही खरे नाही, असे शेतकरीवर्गातून बोलले जात आहे. याबरोबरच ऊस व इतर मिरची, भाजीपाला पिके देखील नदीकाठाला असून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत.
नालेही पात्राबाहेर
या पश्चिम भागातील केंबाळी नालासह उचगाव, बेळगुंदी फाट्यापासून निघणारा नाला, तुरमुरी आणि बाची येथील या सर्व नाल्यांना पूर आल्याचेही चित्र दिसून येत आहे.
पावसाची संततधार, शेतकरी शेतात
पावसाची संततधार सुरू आहे. मात्र शेतातील भात रोपाची लागवड व इतर हंगाम साधण्यासाठी जमिनीतील बियाण्यांच्या पेरणी व लागवडीसाठी शेतकरी माळ जमिनीत शेतवडीतच दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकरी वर्गासाठी हंगाम म्हणजे एक पर्वणीच असल्याने शेतकरी घरी न बसता शेतातील कामात गुंतल्याचे पहावयास मिळत आहे. या भागात रताळ्याचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या रताळ्याच्या वेलींच्या लागवडीत शेतकरी आता गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे. जोरदार पावसामुळे पाण्याचे प्रमाण शेतवडीत अधिक झाल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत पाहता यावर्षी शेतकऱ्यांना शेतीचा खरीप हंगाम साधण्यासाठी शेतकरी माळ जमिनीमध्ये भुईमूग, बटाटे, मिरची, जोंधळा, कुळीथ, सूर्यफुल व इतर भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.









