पेरण्या खोळंबल्या, भात लागवडीचा प्रश्नही ऐरणीवर : जंगमहट्टी धरणातील पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रह धरण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील जीवनदायिनी ठरलेली व हजारो एकर शेतीला पाणीपुरवठा करून परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत करणारी मार्कंडेय नदीचे पात्र जुलै महिन्याला प्रारंभ झाला तरी अद्याप कोरडेच पडले आहे. याचा परिणाम शेतकरी तसेच घरगुती व सार्वजनिक विहिरीतील पाण्याच्या पातळीवर झाला असून सर्वच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून धो धो पाऊस केव्हा येणार आणि विहिरीतील पाण्याची पातळी कधी सुधारणार, याची चिंता सर्वांनाच सतावू लागली आहे. परिणामी जनता पाण्यासाठी देवाला साकडे घालतानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. जूनच्या मध्यंतरानंतर मार्कंडेय नदीच्या पात्रात पाणी वाहू लागते. जूनअखेर व जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेकवेळा मार्कंडेय नदीला पूर येऊन नदीच्या दुतर्फा पसरलेल्या शेतवडीत या पुराचे पाणी पसरणारे चित्र यावर्षी दिसून येत नसल्याने याची सर्वांनाच चिंता लागून राहिली आहे.
शेतातील पिकांवर परिणाम
जुलै महिना सुरू झाला तरी नदीचे पात्र अद्याप कोरडेच दिसू लागले आहे. याचा परिणाम शेतातील पिके तसेच पिण्याच्या पाण्यावरही जाणवत असल्याची चर्चा नागरिकांतून करण्यात येत आहे. मार्कंडेय नदीच्या पात्रात पाणी वाहू लागले किवा नदीचे पात्र भरले की सर्व सार्वजनिक विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात लागत असे. मात्र यावर्षीचे चित्र वेगळेच झाले असून, अद्याप पावसाने म्हणावी तशी दमदार सुरुवात केली नसल्याने पाण्याचे दुर्भिक्ष अद्याप दिसून येत आहे.
पावसासाठी ग्रामस्थांचे देवाला साकडे
आषाढी एकादशीला दरवर्षी मार्कंडेय नदीला महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र आठवडा होत आला तरी अद्याप मुसळधार पाऊस आणि मार्कंडेय नदीला येणारा पूर हे चित्र आता दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे. आता नागरिक देवाकडे पावसाविषयी साकडे घालताना दिसत आहेत. पावसाने लवकरच जोरदार बरसावे आणि शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी देवाकडे करत आहेत.
विहिरीही अद्याप कोरड्याच
नदीच्या दुतर्फा पसरलेल्या जमिनीमध्ये भात, ऊस, भाजीपाला अशी वेगळी पिके घेतली जातात. मात्र नदीचे पात्र कोरडे आणि नदीच्या परिसरात असलेल्या विहिरींनादेखील पाणीच नसल्याने पिकांची वाढ कशी होणार, असा प्रश्न पडला आहे. माळ जमिनीतील खरीप हंगामात येणारा बटाटा, भुईमूग, मिरची, सूर्यफूल, जोंधळा, रताळी व वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला या सर्व पिकांना यावर्षी विलंब झाल्याने पुढील काळात तरी पाऊस येईल का आणि खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांना मिळतील का, या विवंचनेत शेतकरी आहेत. याबरोबरच पश्चिम भागामध्ये भाताचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात येते. मात्र अद्याप पाऊसच न झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या असून भात लागवडीचा प्रश्नही गंभीर झाला आहे. जर येत्या आठवडाभरात मुसळधार पाऊस न झाल्यास दुष्काळाचे सावट या भागाला निश्चितच सतावणार, अशी चिन्हे आहेत.
जंगमहट्टी धरणाच्या पाण्याची अपेक्षा
बेळगाव शहर आणि पश्चिम भागातील जमिनीला व शेतवडीला जीवनदायीनी देणारे जंगमहट्टी धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडले तर उन्हाळा व पावसाळ्यात सतत मार्कंडेय नदीचे पात्र भरलेले राहील. याचा परिणाम या भागातील हजारो एकर जमिनीत पिकणाऱ्या पिकावर त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यावर होईल. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिंडलगा पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा करण्यासाठी मार्कंडेय नदीचे पात्र भरणे गरजेचे आहे. यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र या दोन राज्यातील मंत्री, खासदार, आमदारांनी या जंगमहट्टी धरणातील पाणी आणण्यासाठी जर प्रयत्न केले तर खऱ्याअर्थाने या भागाचा विकास होऊ शकतो. तसेच बेळगाव शहराला कधीही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा पडणार नाही. यासाठी तातडीने या संदर्भात बैठक बोलावून यावर विचारविनिमय करून या धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडण्यासाठी प्रयत्न करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.









