सकाळच्या टप्प्यात 40 टक्के तर दुपारनंतर 4 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान : कारखान्याच्या ठिकाणी मतदानाचे योग्य नियोजन
वार्ताहर /काकती
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मोठ्या चुरशीने मतदान झाले असून निवडणुकीत 67.76 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनेल तानाजी पाटील गटाने विजय मिळविला आहे. शेतकरी बचाव तानाजी पाटील गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे तानाजी पाटील गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळते चेअरमन अविनाश पोतदार यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला होता. पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. सभासद शेतकऱ्यांना मतदान केंद्र कारखान्याच्या कार्यस्थळावर आणण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते दिवसभर धावपळ करीत होते. सभासदांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मतदान करण्यासाठी कार्यकर्ते सर्व ते प्रयत्न करीत होते. दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सकाळच्या टप्प्यात 40 टक्के मतदान झाले होते. तर दुपारनंतर 4 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले.
जे कारखान्याचे सभासद कारखान्याच्या सर्वसाधारण सभांना हजर होते त्यांनाच मतदानाचा हक्क देण्यात आला होता. त्यामुळे अनेक सभासदांना आपला शेअर्स असूनही मतदान करता आले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केली. तर काही सभासदांनी संचालक मंडळाना जाब विचारून हुज्जत घातल्याचे प्रकार घडले. सहकारी कायद्याच्या नियमात बदल केला असल्याने आम्ही काही करू शकत नाही, असे संचालकांनी सभासदांना पटवून दिले. शेतकरी बचाव पॅनेलने सभासदांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे काटेकोर नियोजन केले होते. यामुळे मतदान केंद्र 7 कंग्राळी (बी. के) येथे लांबचलाब रांगा दिसत होत्या तर मतदान केंद्र 9 येथेही सभासदाची मतदानासाठी रीघ लागलेली होती. कारखान्याच्या ठिकाणी मतदानाचे योग्य नियोजन केले होते. प्रत्येक विभागानुसार ओळखपत्र देणे, मतदानाची स्लीप काढून देणे तसेच गाव विभाग मतदान केंद्राची दालणे उघडली होती. यामुळे मतदारामध्ये कोणताही गोंधळ झाला नाही. या निवडणुकीसाठी दोन्ही गटाच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. तालुक्यातील विविध गावात जावून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या.









