काकती ग्राम पंचायतीच्या शिष्टमंडळाचे कारखान्याला निवेदन
वार्ताहर/ काकती
मार्कंडेय नदीत दुष्काळामुळे पाण्याचा साठा मर्यादित असून गायी-गुरांना पिण्याचे पाणी राखीव असणे आवश्यक आहे. अशा बिकट परिस्थितीत येथील मार्कंडेय साखर कारखान्याने नदीतील पाण्याचा उपसा त्वरित थांबवावे, असे निवेदन काकती ग्राम पंचायतीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी कारखान्याच्या कार्यस्थळी जाऊन दिले आहे.
मार्कंडेय नदीपात्रात पाण्याचा साठा अत्यंत कमी असून येथील शेतकरी वर्ग जनावरांची तहान भागविण्यासाठी मार्कंडेय नदीला जनावरे घेऊन येतो. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने गावातील विहिरींनाही पुरेसे पाणी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत मार्कंडेय साखर कारखान्याकडून पाण्याचा उपसा केला जात आहे. यामुळे नदीतील पाण्याचे पात्र कोरडे पडण्याची शक्यता आहे. जनावरांना पिण्याच्या पाणचे महत्त्व ओळखून येथील शेतकरी शिवारातील पिकांना सिंचन करणेसुद्धा बंद करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा उपसा कारखान्याने थांबवावे, असे निवेदनात दिले आहे.
निवेदनाचा स्वीकार कारखान्याचे संचालक बसवराज घाणगेर यांनी केला असून निवेदनाची दखल संचालक मंडळाकडून घेतली जाईल, असे आश्वासन ग्रा. पं. शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात ग्रा. पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, उपाध्यक्षा रेणुका कोळी, सदस्य परशराम नार्वेकर, लक्ष्मण कोळेकर, सुशांत परमोजी, सिद्दू मुचंडीसह अनिल कांबळे, लक्ष्मण मुचंडीकर, जोतिबा कोळी व ग्राम विकास अधिकारी अरुण नाथबुवा आदींचा समावेश होता.









