हेलिकॉप्टर कोची येथील नौदलाच्या एअरबेसवर कोसळले
वृत्तसंस्था/कोची
केरळमधील कोची येथे असलेल्या भारतीय नौदलाच्या तळावर झालेल्या ‘चेतक’ हेलिकॉप्टर अपघातात एका नौसैनिकाला हौतात्म्य प्राप्त झाले आहे. त्याचे नाव योगेंद्र सिंग असे आहे. कोची येथील तळावरील आयएनएस गरुड या युद्धनौकेवर चेतक हेलिकॉप्टर उतरवित असताना हा अपघात घडला. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. योगेंद्र सिंग हे मूळचे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती देण्यात आली. या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश भारतीय नौदलाने दिला आहे. हा अपघात मानवी चुकीमुळे घडल्याचे प्रथमदर्शनी जाणवत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
चेतक हेलिकॉप्टर कोची येथील नौदलाच्या एअरबेसवर कोसळल्याचे सांगण्यात आले असून हे नौदल एअरबेस विल्मिंग्टन बेटावर आहे. नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार आणि भारतीय नौदलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नौसैनिकाच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त करत योगेंद्र सिंग यांना श्र्रद्धांजली वाहिली, असे नौदलाने म्हटले आहे.









