प्रतिनिधी /पणजी
सांतआंद्रे मतदारसंघातील नावशी येथे होऊ घातलेल्या मरिना प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुरगाव पत्तन न्यासने कारगवाल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे ऑक्टोबर 2010 मध्ये केलेला करार रद्द केला असल्याने हा मरिना प्रकल्प जवळपास रद्द केल्यात जमा आहे. या प्रकल्पाला सांतआंद्रेमधील काही नागरिकांनी जोरदार विरोध दर्शविला होता.
प्रकरण न्यायालयात पोहोचले होते व त्यावर सुनावणी चालू होती. मुरगाव पत्तन न्यासने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सदर कन्स्ट्रक्शन कंपनीकडे केलेला करार रद्द केला आहे. या लीज कराराद्वारे सदर कंपनी बंदरच्या अखत्यारित येणाऱया नदी परिसरातील क्षेत्रात मरिनासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देणार होती. न्यायालयात मुरगाव पत्तन न्यासने जे प्रतिज्ञापत्र सादर केले व त्यातून लीज करार रद्द केला आहे याचाच अर्थ मुरगाव बंदर व्यवस्थापनाने मरिना प्रकल्पातून अंग काढून घेतले आहे व हा प्रकल्प जवळपास रद्द करण्यात आलेला आहे.
मनोज परब यांनी केला होता जोरदार विरोध आमदार कार्लुस आल्मेदा यांनी गोवा रिव्होल्युशनरीमार्फत उच्च न्यायालयात बाजू मांडली होती. आरजीचे संस्थापक मनोज परब यांनी संबंधित परिसरातील पारंपरिक मच्छीमारांना त्यांच्या पारंपरिक व्यवसाय सुरू करण्यात सहकार्य मिळावे व त्यांचा हक्काचा परिसर त्यांना मिळावा यासाठी या मरिना प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविला होता व आंदोलन सुरु केले होते.








