कारवाईसाठी हिंदू संघटनांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : बेळगाव परिसरात घडत असलेल्या अप्रिय घटनांना गांजाची नशा कारणीभूत आहे. सहजपणे उपलब्ध होत असलेल्या गांजामुळे बेळगाव परिसरात अनेक दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे गांजाची विक्री व वापर थोपविण्यासाठी पोलीस दलाने कडक उपाययोजना करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केली आहे. शुक्रवारी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक करणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई व्हावी. दरबार गल्ली येथे स्क्रीनवर औरंगजेब व टिपू सुलतान यांचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. ते त्वरित थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
केदनूर ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात गावापासून दोन किलोमीटर अंतरावर महादेव मंदिरात नमाज पढून मांसाहार करण्यात येत आहे. या परिसरात मौजमजा व पार्ट्या करण्यात येत आहेत. त्यामुळे देवस्थानाचे पावित्र्य भंग पावत आहे, ते त्वरित थांबवावे. गांजामुळे अनेक अप्रिय घटना घडत आहेत. तरुणांना सहजपणे गांजा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहराच्या सुखशांतीला तडा जात आहे. पोलिसांनी अमलीपदार्थांची विक्री व वापर रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी श्रीकांत कदम, विजय जाधव, प्रमोद वक्कुंदमठ, आनंद करलिंगन्नावर, सुनील गौरण्णा, संतोष मादिगर, अॅड. सुनील काकतकर, अॅड. जयश्री मंद्रोळी, गंगाराम नाईक, विनोद पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.









