अट्टल गुन्हेगारांचे नशेत कारनामे : शाळा-कॉलेज परिसरात विक्रीचे अड्डे, वाढत्या व्यवहाराने पोलिसांची डोकेदुखी वाढली, धडक कारवाईची मागणी
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात अमलीपदार्थांची विक्री व वापर वाढला आहे. शिक्षण संस्थांजवळ गांजा विक्री होऊ लागली आहे. केवळ गांजाच नव्हे तर पन्नी व इतर अमलीपदार्थ सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहेत. गांजा आणि गुन्हेगारी यांचा संबंध आहेच. गांजाच्या नशेत गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांची संख्याही काही कमी नाही. नशेच्या वाढत्या व्यवहाराने बेळगाव पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांना मोर्चेकऱ्यांनी एक निवेदनही दिले. पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर दगडफेक करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी करण्याबरोबरच बेळगाव परिसरात सुरू असलेला नशेचा व्यवहार थोपविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शिक्षणासाठी बेळगावात अनेक राज्यातील मुले येतात. हॉस्टेल, पीजीमध्ये राहून ते शिक्षण घेतात. शिक्षण संस्थांच्या बाहेरच सहजपणे गांजा व पन्नी विकणाऱ्या गुन्हेगारांची संख्या वाढली आहे. मध्यंतरी पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी अमलीपदार्थांविरुद्ध आघाडीच उघडली होती. गांजा, पन्नी, ब्राऊनशुगरही जप्त करण्यात आले होते. आता अमली पदार्थांविरोधातील कारवाई थंडावली आहे. बेळगावात तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणासह महाराष्ट्रातील विविध भागातून गांजा पुरवठा होतो. कधी रेल्वेने तर आणखी कधी मोटारसायकल व बसने बेळगावला येऊन या नशेच्या साहित्याची विक्री केली जाते. केवळ नागरी पोलीसच नव्हे तर सीआयडी, एनडीपीएस विभाग, सीईएन पोलिसांबरोबरच अबकारी विभागालाही कारवाई करण्याचा अधिकार आहे. या सर्व विभागांकडून वेळोवेळी कारवाईही केली जात असते.
पोलीस किंवा अबकारी विभागाकडून जप्त केलेल्या अमलीपदार्थांची वर्षातून एकदा ड्रग डिस्पोजल कमिटीची मंजुरी घेऊन ते नष्ट करण्यात येतात. एखाद्या कारखान्यातील भट्टीत अमलीपदार्थ नष्ट करण्याची प्रथा आहे. 3 मार्च रोजी अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नावगेजवळील एस.व्ही.पी. केमिकल्स या कारखान्यात मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ नष्ट केले आहेत. उघड्यावर अमलीपदार्थ नष्ट केल्यास प्राणी, पशुपक्ष्यांना व निसर्गाला हानी पोहोचते. म्हणून एखाद्या कारखान्याच्या भट्टीत ते नष्ट करण्याची पद्धत आहे. अबकारी विभागाने बेळगाव उत्तर व चिकोडी विभागात जप्त केलेला 421 किलो 168 ग्रॅम गांजा, 1 किलो 915 ग्रॅम चरस, बागलकोट जिल्ह्यात जप्त करण्यात आलेला 78 किलो गांजा, विजापूर जिल्ह्यात जप्त करण्यात आलेले 90 किलो 44 ग्रॅम अफिम, 106 किलो 732 ग्रॅम गांजा नष्ट करण्यात आला होता. पोलीस दलाच्यावतीनेही ही प्रक्रिया सुरूच असते.
लहान मुलेही अमलीपदार्थांमुळे बरबाद
अमलीपदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया जप्त केल्यानंतरची आहे. आता बेळगाव परिसरात अमलीपदार्थविरोधी कारवाईच थंडावल्याचे दिसून येते. त्यामुळेच नागरी समाजाची चिंता वाढली आहे. शिक्षण संस्थांच्या आवारात सहजपणे अमलीपदार्थ उपलब्ध होत आहेत. बेळगावात त्याचे मार्केटही मोठे आहे. पूर्वी केवळ उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थीच अमलीपदार्थांच्या नादी लागत होते. आता लहान मुलेही अमलीपदार्थांमुळे बरबाद होत आहेत.
बेळगाव परिसरात चोऱ्या, घरफोड्या खासकरून वाहने चोरी प्रकरणात गुंतलेले गुन्हेगार गांजाच्या नशेतच असतात. आजवर अटक केलेल्या बहुतेक गुन्हेगारांनी तपास अधिकाऱ्यांसमोरच याची कबुली दिली आहे. एखादा गुन्हा करण्याआधी अमलीपदार्थाचे सेवन करूनच आपण गुन्हे करतो, असे गुन्हेगारी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे अमलीपदार्थ आणि वाढती गुन्हेगारी यांचा संबंध घनिष्ट आहे. अमलीपदार्थांची विक्री थोपविल्याशिवाय गुन्हेगारी थोपविता येणार नाही.
मध्यंतरी केवळ गांजा विक्री करणाऱ्यांवरच नाही तर सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सपाटा पोलिसांनी सुरू केला होता. यासाठी तपासणी किट मागविण्यात आले होते. पोलीस दलाच्यावतीनेच सिव्हिल हॉस्पिटलला हे किट पुरविण्यात आले होते. तपासणीत गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येत होती. आता हे प्रयत्नही थंडावले असून त्यामुळेच बेळगावात अमलीपदार्थांची खरेदी-विक्री व सेवन मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
गेल्या आठवड्यात मंगळूर पोलिसांनी 75 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले. आजवरची ही मोठी कारवाई मानली जाते. बेळगावही एकेकाळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमलीपदार्थांच्या खरेदी-विक्रीसाठी गणले जात होते. मँडेक्स, हशिश, ब्राऊनशुगर, पन्नी आदी अमलीपदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते. आजही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे कनेक्शन बेळगावशी आहे. पोलीस दलाने गांभीर्याने घेतले तरच नशेचा बाजार रोखता येणार आहे.
अमलीपदार्थ सेवन-विक्रीविरुद्ध मोहीम सुरू
यासंबंधी ‘तरुण भारत’ने पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या आठवड्यापासूनच अमलीपदार्थांचे सेवन व विक्रीविरुद्ध आम्ही मोहीम सुरू केली आहे. शाळा-कॉलेज परिसरात लक्ष ठेवण्यात येत आहे. विद्यार्थी अमलीपदार्थांच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी जागृतीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.










