मिरज :
तालुक्यातील बेडग येथील मरगुबाई मंदिराला मिळणाऱ्या देणगीचा जमा-खर्च हिशेब दिला जात नसल्याचा आरोप करत गुरूवारी संतप्त ग्रामस्थांनी मंदिराला टाळे ठोकले. यावेळी ट्रस्टी आणि ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी मंदिरच बंद केल्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला. रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि गावातील प्रतिष्ठीतांच्या मध्यस्तीने तोडगा काढून मंदिर उघडण्यासाठी प्रयत्न सुरू होता.
मात्र ट्रस्टींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. बेडग येथे प्रसिध्द मरगुबाई मंदिर आहे. सदर मंदिर पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. प्रत्येक वर्षी मोठी यात्रा भरते. वंशपरंपरागत वारस आणि ट्रस्ट मंदिराची देखाभाल करतात. मात्र, मंदिर हक्कावरुन दोन गट आहेत. त्याचा वाद गुरुवारी देवीच्या दरबारातच उफाळून आला. ग्रामस्थ प्रवीण पाटील आणि अमोल दुर्वे यांच्यासह काही ग्रामस्थ सकाळी मंदिरात आले.
ट्रस्टीकडून हिशोब दिला जात नाही. मंदिरात पुजारी दारु पितात. वारंवार मुख्यदरवाजा बंद केला जातो. ओटी भरण्यासाठी पाचशे रुपये मागतात, असा आरोप करण्यात आला. यावेळी ट्रस्टी आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मंदिराला कुलूप लावले. तक्रारदार प्रवीण पाटील म्हणाले, बनारस येथील दोघा भाविकांनी दोन चांदीचे छत, पितळेचे घोडे आणि रोख रक्कम दिली होती. मात्र, त्याच्या पावत्या देण्यास टाळाटाळ केली.
अमोल दुर्वे म्हणाले, महिला भाविकांना ओटी भरण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी होते. आ. सुरेश खाडे यांनी मंदिरासाठी लाखो रुपयांचा निधी दिला आहे. तरीही ग्रामस्थांकडून देणगी गोळा केली जाते, मात्र याचा हिशोब दिला जात नाही, असा आरोप केला. तर ट्रस्टींनी या आरोपांचे खंडन केले असून, ट्रस्टीकडून सर्व जमाखर्च सादर केल्याचा दावा केला आहे.








