भाज्यांचे दर कमी झाल्याने महागाईत घट : जुलैमध्ये 7.44 टक्के होता दर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दरात उल्लेखनीय घट दिसून आली आहे. किरकोळ महागाई दर मागील महिन्यात 6.83 टक्के राहिला आहे. यापूर्वी जुलैमध्ये हा दर 7.44 टक्के होता. भाज्यांचे दर कमी झाल्याने महागाईतील ही घट झाली आहे. परंतु महागाई दर अद्याप आरबीआयच्या 6 टक्क्यांच्या कक्षेच्या वरच आहे.
मागील महिन्यात शहरी महागाई दर कमी होत 6.59 टक्क्यांवर आहे. जुलैमध्ये हा दर 7.20 टक्के इतका होता. ग्रामीण महागाई दर देखील ऑगस्टमध्ये कमी होत 7.02 टक्के झाला आहे. जुलै महिन्यात हे प्रमाण 7.63 टक्के राहिले होते.
ऑगस्ट महिन्यात अन्नधान्यांचा महागाई दर जुलैच्या तुलनेत कमी झाला असून हे प्रमाण 10 टक्क्यांच्या खाली आले आहे. ऑगस्टमध्ये खाद्य महागाई दर कमी होत 9.94 टक्क्यांवर आला आहे. जुलैमध्ये हे प्रमाण 11.51 टक्के राहिले होते.
ऑगस्ट महिन्यात भाज्यांचा महागाई दर कमी होत 26.14 टक्के राहिला आहे. जुलै महिन्यात हे प्रमाण 37.34 टक्के राहिले हेते. डाळींच्या महागाई दरात देखील किरकोळ घसरण झाली आहे. हा महागाई दर 13.04 टक्क्यांवर आला आहे. मसाल्यांचा महागाई दर मात्र वाढला असून तो 23.19 टक्के झाला आहे. जुलैमध्ये हा दर 21.53 टक्के राहिला होता. दूध आणि त्याच्याशी निगडित उत्पादनांच्या महागाईत घट झाली आहे.









