किरकोळ महागाई दर 6.52 टक्क्यांवर ः डिसेंबरमधील 5.72 टक्क्यांच्या तुलनेत वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सर्वसामान्यांवर पुन्हा एकदा महागाईचा बोजा वाढला आहे. जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा केवळ 6 नव्हे तर साडेसहा टक्क्मयांच्या पुढे गेला आहे. जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाई दर वाढून 6.52 टक्क्मयांवर पोहोचला आहे. तर डिसेंबर 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 5.72 टक्के होता. ऑक्टोबर 2022 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6.77 टक्क्मयांच्या उच्चांकावर होता.
जानेवारी महिन्यामध्ये किरकोळ महागाईत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. किरकोळ महागाईचा दर जानेवारीत 6.52 टक्क्मयांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या तीन महिन्यातील उच्चांकी आहे. चलनवाढीतील तीव्र वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक असू शकते. यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. सोमवार, 13 फेब्रुवारी रोजी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (एमओएसपीआय) किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. रिझर्व्ह बँकेने महागाई दर 6 टक्क्मयांच्या खाली महागाई ठेवण्याचा प्रयत्न चालवला असताना हा दर पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेच्या समाधानकारक पातळीच्या वर गेला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित महागाई डिसेंबर 2022 मध्ये 5.72 टक्के आणि जानेवारी 2022 मध्ये 6.01 टक्के होती. मात्र, जानेवारी 2023 मध्ये हा दर साडेसहा टक्क्यांच्या वर पोहोचला आहे.
खाद्यान्न महागाईत वाढ
जानेवारीत खाद्यपदार्थांची महागाई 5.94 टक्के इतकी नोंद झाली आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये खाद्यान्न महागाई दर 4.19 टक्के होता. किरकोळ महागाई वाढल्याने खाद्यपदार्थ महागणार आहेत. देशाच्या ग्राहक किंमत निर्देशांकात फक्त अन्न किंमत निर्देशांकाचा सुमारे 40 टक्के हिस्सा आहे. मागील वर्षी म्हणजे जानेवारी 2022 मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.43 टक्के होता.
जानेवारी 2023 मध्ये महागडय़ा दुधाचा परिणाम किरकोळ महागाई दरावर दिसून येत आहे. दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या महागाईचा दर 8.79 टक्के आहे. दुसरीकडे, मांस आणि माशांच्या महागाईचा दर 6.04 टक्के, अंडी 8.78 टक्के आहे. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर नकारात्मक असून तो -11.70 टक्के आहे. फळांच्या महागाईचा दर 2.93 टक्के राहिला. जानेवारी 2023 मध्ये पान-तंबाखूचा महागाई दर 3.07 टक्के आणि गृहविषयक महागाईचा दर 4.62 टक्के इतका नोंद झाला आहे.









