खरीपासाठी धडपड : शेतकऱ्यांसमोर प्रश्न
बेळगाव : खरीप हंगाम जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे बळीराजाची धडपड सुरू झाली आहे. मात्र बियाणांच्या दरात यंदा किरकोळ वाढ झाल्याने चिंतादेखील वाढली आहे. आधीच वळीव लांबणीवर पडला आहे. त्यातच बियाणांच्या दरात वाढ झाल्याने बळीराजासमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामात भात, बटाटा, भुईमूग, सोयाबीन, तंबाखू, तूर आदी बियाणांची पेरणी आणि लागवड होते. त्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात बियाणांची गरज भासते. मात्र बियाणांच्या दरात वाढ झाल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचा ठरणार आहे. रासायनिक खताचे दर स्थिर असले तरी बी-बियाणांच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. दुष्काळ, नैसर्गिक संकटे, वाढती मजुरी, वाढते रासायनिक खताचे दर आदी कारणामुळे शेती अडचणीत येऊ लागले आहे. उत्पादनासाठी केलेला खर्च शेतीतून निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. पाऊस अधिक प्रमाणात होऊन पिकांचे नुकसान होते. तर कधी सुका दुष्काळ पडतो. त्यामुळे बळीराजाने शेतीपिकांसाठी केलेला खर्चदेखील निघत नाही. अशा परिस्थितीतही शेतकरी शेती उत्पादनासाठी धडपड करू लागले आहेत. मात्र वाढत्या महागाईबरोबर रासायनिक खताचे दर बी-बियणांचे दर आणि कीटकनाशकाचे दरदेखील वाढू लागल्याने शेतकऱ्यांसमोर शेती करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकत आहे. येत्या खरीप हंगामासाठी कृषी खाते तयारीला लागले आहेत. वेळेत बी-बियाणे आणि खते पुरविण्यासाठी खात्याची धडपड सुरू झाली आहे. दरम्यान काही ठिकाणी कृत्रिम खताची टंचाई निर्माण करून पैसे उकळण्याचे प्रकारदेखील घडू लागले आहेत. अशावर आळा घालण्यासाठी कृषी खात्याचे भरारी पथकदेखील सज्ज झाले आहे. अप्रमाणित बियाणे, बनावट रासायनिक खते विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना जमीन कसणे, मशागत, शेणखत, मजुरी, बी -बियाणे आणि रासायनिक खतांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आतापासूनच जुळवाजुळव सुरू झाली आहे. मात्र यंदा बी-बियाणांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सोयाबीन, बाजरी, ज्वारी, उडीद, भुईमूग, सूर्यफुल, मक्का आदी बियाणांच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. खताची लिंकींग किंवा बोगस खत विक्रेत्यांवर कृषी खात्याची नजर असणार आहे. एखादा विक्रेता बनावट खत विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी जवळच्या रयत संपर्क केंद्रात किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार करावी. बी-बियाणे आणि खते कमी पडणार नाही. यासाठी कृषी खात्याची धडपड सुरू आहे.
आर. बी. नायकर, (तालुका कृषी अधिकारी)
खरीप हंगामासाठी बी बियाणे आणि खताची तजवीज करण्यात आली आहे. बोगस खते आणि बी-बियाणे विकण्यावर कारवाई केली जाणार आहे. काही बियाणांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. मात्र इतर बियाणांचे दर स्थिर आहेत.









