घरपट्टीसह विविध सेवा शुल्कांत वाढ करण्याचा प्रस्ताव, 26 रोजीच्या पालिका मंडळ बैठकीत येणार चर्चेस
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिका 50 टक्के कचरा शुल्कवाढीनंतर आता मडगाववासियांना पुन्हा एकदा शॉक देण्यास सज्ज झाली असून यावेळी घरपट्टीसह अन्य सेवांच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव 26 रोजी होणाऱ्या पालिका मंडळाच्या बैठकीसमोर येणार आहे.यंदाच्या आर्थिक वर्षापासून पालिकेने प्रत्येक घरमालकाचे घरोघरी कचरा उचल शुल्क 600 ऊपयांवरून 900 ऊपये करताना तब्बल 50 टक्के शुल्कवाढ केलेली आहे. आता पालिकेने ज्यांना 100 ऊपये घरपट्टी आहे त्यांना दिवसाला 1 ऊपया याप्रमाणे वर्षाला 365 ऊपये घरपट्टी आकारण्याचे ठरविले असून तसा प्रस्ताव 26 रोजीच्या पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे. जर घरपट्टी वाढ झाली, तर मडगाववासियांसाठी भाजपप्रणित मंडळ मडगाव पालिकेत सत्तेत आल्यानंतरचा हा दुसरा ‘शॉक’ ठरणार आहे.
100 रुपये असलेल्या घरपट्टीत जवळपास तीनपट वाढ होणार असल्याने त्यावर काही नगरसेवकांनी नापसंती दर्शवली आहे. मडगाव पालिकेकडून आझादनगरी, मोती डोंगरसारख्या झोपडपट्ट्यांना तसेच पोलीस, कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांचे गाळे, जुन्ता क्वार्टर्स, पॉवर हाऊस व अन्य कर्मचारी गाळ्यांना घरपट्टी तसेच त्याला जोडून वसूल केले जाणारे कचरा शुल्क कित्येक दशकांपासून आकारले जात नसल्याने मडगाववासियांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मध्यतंरी काही नागरिकांनी कचरा शुल्कवाढीला विरोध करताना वरील झोपडपट्ट्या तसेच गाळ्यांना कर लागू न केल्यास घरपट्टी आणि कचरा शुल्क भरणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी त्यांची समजूत काढताना कर सर्वांना लागू करण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते आणि त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू केली होती. मात्र सध्या यासंदर्भात काय स्थिती आहे हे समजू शकलेले नाही.
प्रस्तावित शुल्कवाढ
घरपट्टीसह अन्य सेवांच्या बाबतीत शुल्कवाढ करण्याचा पालिकेचा प्रस्तावही या बैठकीसमोर येणार आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. नवीन प्रस्तावित शुल्कवाढ पुढीलप्रमाणे आहे-कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी प्रति दाखला 100 रु., सुधारणेसाठी 50 रु., पालिका सभागृह आरक्षित करण्यासाठी अर्ध्या दिवसामागे 1000 रु., जन्म वा मृत्यू दाखल्यात नाव सुधारण्यासाठी अर्ज रु. 200, जन्म वा मृत्यू दाखल्यात सुधारणेसाठी आदेश रु. 200, उत्पन्न दाखला रु. 100, वाहनांवर केला जाणारा बेकायदा व्यवसाय दिवसामागे रु. 1 हजार दंड, भाडेपट्टीवर दिलेली जागा-दरमहा किमान शुल्क रु. 10 हजार व त्याहून अधिक, व्यापार परवान्याविना व्यवसाय-दिवसाकाठी प्रत्येक दुकानामागे 5 हजार, व्यावसायिक आस्थापनाचे हस्तांतरण-प्रत्येक जागेमागे रु. 5 हजार, घरपट्टी 365 रु., अबकारी खात्याला सादर करायचा ना हरकत दाखला रु. 2 हजार, पाणी व वीज यासाठी ना हरकत दाखला रु. 1 हजार, सार्वजनिक आरोग्य कायद्याखाली पाणी व वीजजोडणीसाठी एनओसी रु. 5 हजार, सोपो शुल्क रु. 20.









