प्रतिनिधी /मोरजी
मोरजी पंचायत क्षेत्रातील मरडीवाडा या मुख्य रस्त्यावर कोको आर्ट गॅलरीजवळ धोकादायक खड्डा तयार झाला आहे. या खड्डय़ाचा अंदाज न आल्यामुळे अनेकांना अपघात झाले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
मे महिन्यात या रस्त्यावर हा खड्डा तयार झाला. पंधरा दिवसांपूर्वी या खड्डय़ाबाबत प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक नागरिक तथा माजी उपसरपंच अमित शेटगावकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु धो धो पडत असलेल्या पावसामुळे हा खड्डा पुन्हा एकदा जीवघेणा ठरत आहे. या खड्डय़ाच्या बाजूलाच एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी दिल्लीतील काही पर्यटक वास्तव्य करून असतात. त्यांची या रस्त्याच्या बाजूला ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. खड्डे वाचवताना वाहनांचे अनेकवेळा अपघात घडतात.
एका अपघातात चार जाण या अपघातात जखम झाली होते त्या जखमींना स्थानिक नागरिक सोनू शेटगावकर यांनी मदत केले. शिवाय त्यांच्या घराशेजारी असलेल्या तुळशीवृंदावनाला वाहनाची धडक बसून मोडतोड झाली. या खड्डय़ांमुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. आणि याकडे पोलिसांचे आणि सार्वजनिक बांधकाम खाते पेडणे विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे लोकांना रात्री अपरात्री अपघातात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी धाऊन जावे लागते, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
दरम्यान, दाभोळकरवाडा ते गावडेवाडा किनाऱयावर जाणारा रस्ताही सध्या धोकादायक बनला आहे. या रस्त्याची चाळण झालेली आहे. आणि या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिक नाराजी व्यक्त करत आहेत. या रस्त्यावरून वाहने चालवताना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागतात. याकडे त्वरित स्थानिक आमदार जित आरोलकर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.









