आमदार, मंत्र्यांनी मराठीतून गायली इतिहासाची गाथा : छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महारांजांचा गौरव
पणजी : गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा काल शुक्रवारचा शेवटचा दिवस ऐतिहासिक ठरला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फोंड्यातील मर्दनगड गडाचा मुद्दा आमदार दाजी साळकर यांनी मांडून गडाचे संवर्धन करण्याची मागणी केली. मर्दनगडाच्या मुद्यावरून विधानसभागृह मराठीमय झाले. मराठी भाषेतून मर्दनगडाचे महत्व सांगताना अनेक आमदारांनी मराठी कविता, पोवाड्यांचा आधार घेतल्याने अवघे सभागृह मराठीच्या हुंकाराने निनादून गेले. आमदार दाजी साळकर यांच्या मुद्यावरून पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी अस्सलिखीत मराठीत संभाषण केले.
आमदार उल्हास नाईक तुयेकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास मराठीतून व्यक्त करताना ते धगधगते पर्व असल्याचे सांगितले. सभागृहातील ज्येष्ठ नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही या किल्ल्याची महती आणि त्यापूर्वीचा इतिहास मराठीतून सांगत या गोव्याच्या भूमित मराठी किती खोलवर ऊजली आहे, हे दाखवून दिले. आमदार गोविंद गावडे यांनी दाजी साळकर यांच्या ठरावाला सहमती दर्शवताना आपल्या अंगी असलेल्या कलेचे दर्शन घडवत थोर साहित्यिक स्व. विष्णू वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे गोव्यात आगमन झाले, त्या आगमनाविषयी पोवाडा सादर केला…
अनंत ऊर्जा घेऊनी इथली सळसळती माती
दर्यावरूनी आले शिवाजी खडगे घेऊनी हाती
द्रोणाद्रीच्या पदरावरती चरणस्पर्श केला
तेथून राजा फोंड्यामधल्या किल्ल्याशी आला
चोहोबाहुजींनी वेढा घालून केली तटबंदी
किल्ल्यावरची रसद तोडली युद्ध होई जंगी
तीन महिने युद्ध चालले तुंबळ घनघोर
हळूहळू हो गळू लागला महमद खाँ चा जोर
भर पावसात होऊनी बिजली
शिवरायांची तळपते तलवार…
ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी खुल्या मनाने हा ठराव मांडणारे आमदार दाजी साळकर यांचे, त्यानंतर मराठीतूनच पोवाडा सादर केलेले गोविंद गावडे तसेच या ठरावावर मराठीतूनच संभाषण केलेले मंत्री सुभाष फळदेसाई यांचे विशेष अभिनंदन केले.
सर्वांनी सहकार्य द्यावे : ढवळीकर
मंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, “मर्दनगडाच्या विकासासाठी जी जी मदत करता येईल ती आम्ही लोकप्रतिनिधींनी केली पाहिजे. किल्ल्यावर जाण्यासाठी रस्त्याची जी अडचण असेल ती सोडविण्यासाठी आपण मदत करेन. कारण या किल्ल्या परिसरात आमची वडिलोपार्जित जमीन आहे आणि त्याच जमिनीतून हा रस्ता किल्ल्यापर्यंत नेणे शक्य आहे. मर्दनगड किल्ल्याची स्वच्छता करण्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे, ही श्रींची इच्छा…” असे मंत्री ढवळीकर यांनी सांगून आपल्या मदतऊपी स्वभावाचे दर्शन सभागृहात घडवले.
किल्ला विकास प्राधिकरणाचा विचार
राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी सरकार ठाम आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या धर्तीवर किल्ला विकास प्राधिकरण करण्याचा विचार पुरातत्त्व खात्यामार्फत नक्कीच केला जाईल. त्यासाठी कायद्याचा अभ्यास केला जाईल. कारण प्राधिकरण झाले तरच महाराष्ट्राप्रमाणे युनेस्कोमधून गोव्यालाही किल्ले संवर्धनासाठी अनुदान मिळू शकते, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.









