गणाचारी गल्लीतील नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : गणाचारी गल्लीतील बकरी मंडईच्या जागेचा वाद दिवसेंदिवस चांगलाच गाजत चालला आहे. प्रभाग क्र. 7 मधील रहिवाशांनी बकरी मंडईतील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी समुदाय भवन उभारण्यासाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी सोमवार दि. 10 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शिरस्तेदार एस. एम. परगी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. गणाचारी गल्लीतील बकरी मंडई येथील जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून त्या ठिकाणी सामुदायिक भवन उभारण्यात यावे,
यासाठी नगरसेवक शंकरगौडा पाटील यांनी प्रयत्न चालविले आहेत. मात्र, याला खाटिक समाजातून तीव्र विरोध केला जात आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बकरी मंडईच्या जागेवरून आरोप-प्रत्यारोप केले जात असून महानगरपालिकेला दोन्ही बाजूंच्यावतीने निवेदनदेखील देण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारी गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईच्या जागेत समुदाय भवन उभारण्यात यावे, यासाठी स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. ‘अतिक्रमण हटवा’, ‘आम्हाला बदल हवा आहे’, ‘महापालिकेची जागा वाचवा’, ‘समुदाय भवन झालेच पाहिजे’,
‘प्रभाग क्र. 7 मधून जाहीर पाठिंबा’ अशा मागण्यांचे फलक घेऊन रहिवासी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. बकरी मंडईची जागा ही गणाचारी गल्लीला दान स्वरुपात मिळालेली जागा आहे. त्यामुळे या जागेचा सदुपयोग व्हावा, या अनुषंगाने सदर ठिकाणी समुदाय भवन उभारण्याचा निर्णय स्थानिक नगरसेवकांनी घेतला आहे. या परिसरात जवळपास मंगल कार्यालय नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. एखाद्या ठिकाणी कार्यक्रम करायचा असल्यास 25 ते 30 हजार रुपये भाडे द्यावे लागते. गणाचारी गल्लीत समुदाय भवन झाल्यास त्याचा सर्वांना मोफत लाभ घेता येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.









