एस. वरलक्ष्मी यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. यासाठी येत्या 27 डिसेंबर रोजी विधानसौधवर कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघातर्फे (सीआयटीयू) धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा कार्यदर्शी एस. वरलक्ष्मी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सर्वसमावेशक बाल विकास योजनेला 49 वर्ष पूर्ण झाली तरी अद्याप अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना विविध सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. किमान वेतन लागू करा शिवाय तातडीने ग्रॅच्युईटी द्या, गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार नोकरीत कायम करा. यासह इतर मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. अंगणवाड्यांना पुरविण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने बालक आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ लागला आहे. यासाठी अंगणवाड्यांना दर्जात्मक आहार सामुग्री पुरवा अशी मागणी करण्यात आली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे दैनंदिन समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे. अशी मागणी करण्यात आली आहे. याबरोबर इतर मागण्यांसाठीही येत्या 17 डिसेंबर रोजी चलो विधानसौधची हाक देण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.









