अ. भा. वीरशैव महासभेची घोषणा
प्रतिनिधी /बेळगाव
वीरशैव-लिंगायत समाज हा जाती-भेद विरहित समाजाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून समाजातील सर्व घटकांना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देत शिक्षण व दासोहाच्या माध्यमातून देशाच्या सर्वांगिण विकासासाठी झटलेला समाज आहे. आज सामाजिक न्यायासाठी याच समाजाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांनी ही माहिती दिली. यावेळी महासभेचे सरचिटणीस आण्णासाहेब कोरबू, रमेश कळसण्णावर, सुजित मुळगुंद, ज्योती बदामी आदी पदाधिकारी उपस्थित होते. वीरशैव लिंगायत समाजाचा समावेश ओबीसीच्या यादीत करण्यात यावा यासाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे रत्नप्रभा यांनी सांगितले.
वीरशैव लिंगायत समाजाने शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. जात, पात, भेद विसरून सर्व घटकांना शिक्षण मिळवून देण्याचे काम या समाजाने केले आहे. वीरशैव लिंगायत समाजातील अनेक घटकांचा सहा वर्षांपूर्वी राज्यातील ओबीसी यादीत समावेश झाला असला तरी केंद्रीय यादीत अद्याप समावेश करण्यात आला नाही. ही खेदाची बाब आहे, असेही या नेत्यांनी सांगितले.
3-बी मध्ये समावेश करा
समाजातील गरजूंना शासकीय सोयी, सुविधा मिळाव्यात यासाठी ओबीसी यादीत (3-बी) समावेश करावा म्हणून 1 ऑगस्ट रोजी चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून जिल्हाधिकाऱयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात येणार आहे. समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने या आंदोलनात भाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
महापौरपदाची मागणी…
बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत वीरशैव लिंगायत समाजाला पहिले प्राधान्य द्यावे, यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना पत्र पाठविण्यात आल्याचे या पदाधिकाऱयांनी सांगितले.









