बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, विविध औद्योगिक व्यापारी संघटनांतर्फे बेळगाव बंदची हाक
बेळगाव : वाढीव वीजबिल विरोधात बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तसेच शहरातील विविध औद्योगिक व्यापारी संघटनांच्यावतीने गुरुवारी 22 रोजी बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. बेळगावमधील औद्योगिक वसाहती व व्यापारी पेठा बंद ठेवून उद्योजक व व्यापारी मोर्चात सहभागी होणार आहेत. धर्मवीर संभाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून वीजबिल मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. मे महिन्याच्या विद्युत बिलामध्ये 30 ते 70 टक्के वाढ करण्यात आली. ही भरमसाट दरवाढ उद्योजकांसह नागरिकांना डोकेदुखीची ठरत आहे. यामुळे उद्योग क्षेत्राचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे सरकारने ही वाढीव दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. सकाळी 10 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापासून चन्नम्मा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीजबिल कमी करण्याचे आवाहन केले जाणार आहे. यामध्ये उद्यमबाग, मच्छे, मजगाव, अनगोळ, नावगे, काकती, होनगा, ऑटोनगर येथील उद्योजक व त्यांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. बेळगावमधील विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला असून आपले व्यवहार बंद ठेवत आपण मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे कळविले आहे.
एफकेसीसीआयचा प्रस्तावित कर्नाटक बंद मागे
बेंगळूर : वीजदरवाढीच्या विरोधात प्रस्तावित कर्नाटक बंद फेडरेशन ऑफ कर्नाटका चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने मागे घेतला आहे. बंद पुकारण्याची कोणतीही योजना नाही असे संघटनेने स्पष्ट केले. राज्याचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांच्याशी आम्ही सतत संपर्कात आहोत. दरवाढीसंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री सध्या दिल्लीला गेलेले आहेत. ते आल्यानंतर यावर निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आम्ही ‘थांबा आणि वाट पहा’ हे धोरण अवलंबिलेले आहे, असे संघटनेचे अध्यक्ष गोपाल रे•ाr यांनी स्पष्ट केले.









