प्रेमानंद शिरोडकर / माशेल
आषाढी एकादशीनिमित्त साजरा होणारा माशेल गावातील प्रसिद्ध चिखलकाला आज शुक्रवार 30 रोजी साजरा होणार आहे. देऊळवाडा माशेल येथे होणाऱ्या या लोकोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा असून यंदा पर्यटन खात्यातर्फे राज्य उत्सव म्हणून चिकलकाला महोत्सव स्वऊपात साजरा होत आहे. त्यासाठी जैयत तयारी करण्यात आली असून देशविदेशातील पर्यटकांना या उत्सवाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.
माशेल गावात तसे वर्षभर अनेक उत्सव साजरे होतात. मात्र येथील प्रमुख मंदिर असलेल्या श्री देवकीकृष्ण मंदिरतर्फे स्थानिकांच्या माध्यमातून साजऱ्या होणाऱ्या दोन प्रमुख उत्सवापैकी चिखलकाला हा प्रमुख उत्सव. त्यामुळे भाविकांना या उत्सवाबद्दल विशेष आकर्षण वाटते. चिखलकाल्याला खूप जुनी परंपरा असून तो नेमका कधी सुऊ झाला याची लिखित माहिती उपलब्ध नाही. या उत्सवाला लोकोत्सवाचे स्वऊप असून लोकगीते पारंपारिक खेळ, नाच, गाणी अशा विविध प्रकारांचा त्यात समावेश आहे. श्रीकृष्णाच्या बालक्रीडांशी निगडीत असा हा उत्सव असून आजही त्याचे स्वऊप बदललेले नाही. पूर्वी देऊळवाडा भागातील मर्यादित लोक चिखलकाल्यात सहभागी व्हायचे. आता आसपासच्या गावातील लोकही त्यात सहभागी होऊ लागल्याने या उत्सवाला व्यापक स्वऊप आले आहे. यंदा राज्य उत्सव म्हणून चिकलकाला साजरा होत असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी चिखलकाल्याचे नेतृत्व कै. लक्ष्मण भगत, कै. विश्राम सावळ व अन्य ज्येष्ठ मंडळी करीत. सध्या किशोर भगत हे नेतृत्व करतात.
उत्सवाच्या दिवशी सकाळी 11.30 वा. सुमारास देऊळवाड्यावरील मंडळी देवकीकृष्ण मंदिरात जमल्यानंतर श्रींस गाऱ्हाणे घातले जाते. पारंपारिक समई प्रज्वलीत करून चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहाला सुऊवात होते. वाड्यावरील कलाकार तीन तीन तास याप्रमाणे भजनी पार सादर करतात. गेल्या काही वर्षापासून महाशाला कला संगमचे कलाकार सप्ताहात भजने सादर करीत आहेत. चिखलकाल्याच्या दिवशी सकाळी गावातील तऊण व लहान मुले देवकीकृष्ण मैदानावर पाणी अडविण्याची व्यवस्था करतात. त्यानंतर बाजारात जाऊन दुकानदारांकडून तेल मागून ते अंगाला चोपतात. दुसऱ्या बाजूने चिखलकाल्याचा प्रमुख ‘गोपाळ गडी यारे’ असे लोकगीत गात सर्वांना साद घालतो. सर्व मंडळी हरिनामाचा जयघोष करीत दाडशंकर मंदिराकडे जाऊन तेथे देवदर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाच्या कपाळाला नाम लावला जातो. तेथून ‘जय विठ्ठल हरि विठ्ठलच्या’ नामघोषात श्रीदेवकीकृष्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरात प्रवेश करतात. पारंपारिक समई भोवती ‘जय विठ्ठल हरि विठ्ठल’ असा गजर करीत फेर धरतात. पुजाऱ्याकडून भाविकांवर तीर्थ शिंपडले जाते व समईतील तेल अंगाला लावून सर्व मंडळी चिखलकाल्यासाठी सज्ज होते.
येथील पिंपळाच्या कट्ट्यावर गव्हांचे पीठ व नारळापासून तयार केलेला बोल हा खाद्य पदार्थ व इतर खाऊ भाविकांच्या गर्दीमध्ये फेकला जातो. ते मिळविण्यासाठी सर्वांमध्ये चढाओढ लागते. यावेळी गेल्या वर्षीचे नवस फेडण्याची व नवीन नवस करण्याची प्रथा आहे. त्यानंतर भर पावसात चिखलकाल्याला सुऊवात होते. त्यात विविध प्रकारचे पारंपारिक खेळ खेळले जातात. बेडुकउड्या, चेंडू फेकणे, आंधळी काशिंबीर, चक्र, मेंढऱ्या पळविणे अशा खेळांचा त्यात समावेश असतो. दोन गटामध्ये शक्ती प्रदर्शनही होते. त्यातील मजेशीर प्रकार म्हणजे नवरा-नवरी हा खेळ. त्यात दोन गटामध्ये गाणी व नाच होतो. पूर्वी कै. विश्राम सावळ कोणतेही वाद्य न घेता आपल्या कंठातून अचूक सनई वाजवायचे व सर्व ताल धरून नाचायचे. हल्ली आधुनिक पद्धतीची गीते वाजवून हा खेळ खेळला जातो. हे खेळ खेळताना परस्पराच्या अंगावर चिखल फेकणे तसेच वाद संवादही चालतो. शेवटी नवरानवरीला एकत्र आणून वरमाला घातल्यानंतर दही हंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. चिखलकाल्याचा समारोप होऊन गावातील तळीवर सर्व भाविक आंघोळीला जातात. देवकीकृष्ण मंदिरात आरत्या, तीर्थप्रसाद व गाऱ्हाणी घालून चोवीस तासांच्या अखंड भजनी सप्ताहाची सांगता केली जाते. यंदा चिकलकाला महोत्सव साजरा होत असल्याने पारंपरिक भजनी सप्ताह व लोकोत्सवाला जोडून अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री रोहन खवटे व कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते एकादशीच्या पूर्वसंध्येला या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यंदा या महोत्सवाचे आकर्षण म्हणजे श्री देवकीकृष्ण मंदिर रोषाणाईने साजविण्यात आले असून मैदानावर शाकाहरी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच चिकलकाला खेळणाऱ्यांसाठी काही सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. गोव्यातील पारंपरिक लोकोत्सवांना पर्यटनीय महत्त्व व प्रोत्साहन देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.









