ढगफुटी सदृश पावसाने पिकांचे मोठे नुकसान : काही ठिकाणी लष्कराला पाचारण
बीड/ अहिल्यानगर/ मुंबई /पुणे :
राज्यभरात सध्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ढगफुटी सदृश पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरश: खरडून गेल्या आहेत. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर आला असून अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली अशा सर्वच जिह्यात बेफाम पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.
विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढले. शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस झाला असून सिंदफना नदीला पूर आला आहे. आणि याच पुराचे पाणी परिसरातील घरांमध्ये दुकानांमध्ये शिरले आहे. शिरूर शहरातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केले असून तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मध्यरात्री अचानक दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही पूरसदृश परिस्थिती दिसून येते आहे. घरांसह नदीकाठचे दुकाने सध्या पाण्यात आहे.
चांदणी नदीने रौद्ररूप धारण केले असून चावडी शाळा व घराघरात पाणी साचले आहे, यामुळे गावकऱ्यांच्या नुकसान झाले असून घराघरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूचे होते नुकसान झाले आहे. शेती पिकांचे हे अतोनात नुकसान झाले आहे. शिरसाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे जवळपास 200 -300 लोक अडकलेले आहेत.
बीडमध्ये पावसाचा हाहा:कार, भूम, परांड्यात लष्कराला बोलावलं
सध्या काही प्रमाणात पाणी ओसरले असले तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. नागरिक स्वत?च्या प्रयत्नांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु प्रशासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन आणि हेलिकॉप्टर रेस्क्यू टीमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचवले जात आहेत. नागरिक सरकारकडे तातडीने मदतीसाठी मागणी करत आहेत आणि आपत्ती निवारणाची व्यवस्था तत्काळ करण्याची मागणी करत आहेत.
26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पाऊस वाढणार
24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान 30 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही. सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. हा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. यादिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.







