मुंबईत मोठ्या घडामोडींना वेग : जागा वाटपापासून अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय
मुंबई : : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या वेळीही जनमानसावर पकड राहावी आणि जागावाटपाचे त्रांगडे वेळीच सुटावे यासाठी मंगळवार दि. 27 ऑगस्टपासून तीन दिवस मुंबईत हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीची मॅरेथॉन बैठक आयोजित केली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर संशयास्पद वातावरण नको म्हणून या बैठकीत जागा वाटपापासून अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय शक्यता आहे.
राज्यात विधानसभा निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. काही नेत्यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. तर काही पक्षांनी सभा घेण्यावर भर दिला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 27, 28 आणि 29 ऑगस्ट अशा तीन दिवसांच्या मॅरेथॉन बैठकांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने महाविकास आघाडीचे सर्वच नेते मुंबईत तळ ठोकून राहणार आहेत.
जागा वाटप ही सर्वाच पक्षांची मोठे डोकेदुखी आहे. ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र ठरविल्यास जास्त आमदार निवडून आणण्यासाठी घटकपक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा सुरू होते. त्यामुळे युती किंवा आघाडीचेच नुकसान होते हे कोणाच्या लक्षातही येत नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरविण्याची महाआघाडीच्या घटक मागणी केली होती. निदान मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर बंद दाराआड चर्चा करा, अशीही उद्धव ठाकरे यांची मागणी होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. आधी निवडणूक, नंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे नंतर वाद करत राहण्यापेक्षा आधीच निर्णय होणे योग्य या दृष्टीने ही बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीतही इंडिया आघाडी अंतर्गत राज्यात महाविकास आघाडीच्या बैठका होत होत्या. त्याचा चांगला फायदा झाल्याचे दिसले आहे. त्यामुळे विधानसभा निवणुकीसाठीही महाविकास आघाडी सतर्क झाली आहे.
गेल्या काही दिवसात काही आमदार आणि काही पक्षांचे नेते हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटून गेले. त्यामुळे या नेत्यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या बैठकीचे हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे. विद्यमान आमदारांची संख्या वगळून इतर जागांबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीत कुणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अदलाबदलींवरही चर्चा?
या बैठकीत काही जागांच्या अदलाबदलीवरही चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी ही तडजोड करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राजकीय वातावरण बदलले आहे. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे नेते अत्यंत सावधपणे पावले टाकणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणत्या जागांची अदलाबदली होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
मित्र पक्षांना जागा
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनच पक्षांनी आपआपसात जागा वाटप करून निडवणूक लढवली होती. छोट्या पक्षांना एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे यावेळी समाजवादी पार्टी, डाव्या पक्षांसह इतर घटक पक्षांना महाविकास आघाडीकडून जागा सोडल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आधी छोट्या पक्षांना किती जागा सोडायच्या याचा निर्णय करण्यात येईल. त्यानंतर ऊर्वरीत जागांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नवे दोस्त जोडणार
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण चांगलेच बदलले आहे. अनेक छोट्या पक्षाचे नेते आणि आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यात भाजपच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांचाही समावेश होता. बच्चू कडू यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या सर्वांना सोबत घ्यायचे की नाही, याची चर्चाही या बैठकीत होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.









