आमदार गोविंद गावडे गायला मराठीचा गौरव
पणजी : मराठी ही फार प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे, याबाबतचा प्रत्यय काल बुधवारी विधानसभागृहात आला. दुपारी मागण्यांच्या सत्रात प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी मराठी भाषेतून उद्गार काढताना ‘अज्ञानऊपी रोपट्याला शिक्षण नावाचं खतपाणी घातलं तरच आजचे एक छोटेसे रोप उद्याचा सुशिक्षित वटवृक्ष होईल. आजचं छोटसं रोप उद्या वटवृक्ष होण्यासाठी सरकारने गांभीर्यानं घ्यावे. कारण मराठी ह्या मातृभाषेतील प्राथमिक शाळांना सरकारने आकार दिला तरच प्राथमिक शाळांचे भवितव्य टिकणार आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मातृभाषेत मोठी ताकद आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले.
विधानसभा अधिवेशनात शिक्षण खात्यावर बोलताना आमदार गोविंद गावडे यांनी पूर्णवेळ मराठीतूनच संभाषण केले. यंदाच्या अधिवेशनात सर्वाधिक वेळ मराठीतून बोलणारे ते पहिले आमदार ठरले. काही दिवसांपूर्वी जीत आरोलकर यांनीही मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी विधानसभागृहात केली होती. सरकारने कोकणीबरोबरच मराठीलाही राजभाषेचा दर्जा देण्याची ही योग्य वेळ आहे, असे मत आरोलकर यांनी मांडले होते. यापूर्वीच्या माजी आमदारांपैकी दिवंगत विष्णु सूर्या वाघ व माजी आमदार नरेश सावळ यांनीही मराठीची भूमिका विधानसभागृहात मांडून या भाषेची परंपरा, इतिहास स्पष्ट केलेला आहे.









