बेळगाव-गोवा मार्गावरील प्रकार : कन्नड-इंग्रजीमध्ये फलक
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य सरकारने कानडीकरणाचा वरवंटा फिरवत असताना आता केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही मराठीचे वावडे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावर केवळ कन्नड व इंग्रजी या दोनच भाषांमध्ये फलक लावण्यात आले असून, यामुळे स्थानिक मराठी भाषिकांची गैरसोय होत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव-खानापूर-गोवा या मार्गावर नव्या महामार्गाची बांधणी मागील काही वर्षांपासून सुरू आहे. यापैकी मच्छे ते खानापूर दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला असून, दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. बेळगाव ग्रामीण व खानापूर या दोन्हीही मतदारसंघातून हा रस्ता जातो. या दोन्ही मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कन्नड व इंग्रजीसह मराठीमधूनही दिशादर्शक फलक लावणे गरजेचे होते.
जमीन मराठी शेतकऱ्यांची; फलक मात्र कानडीत
बेळगाव-गोवा या महामार्गासाठी शेकडो एकर मराठी भाषिक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. मराठी भाषिकांची जमीन असताना त्यावर लावण्यात आलेले फलक मात्र कानडी व इंग्रजीत आहेत. या विरोधाभासामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. स्थानिक शेतकरी व नागरिक जास्तीत जास्त मराठी असल्यामुळे त्यांना इतर भाषा अवगत नाहीत. त्यामुळे मराठीतूनच फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
मराठीत फलक न लावल्यास आंदोलनाचा इशारा
बेळगाव-गोवा या मार्गावरून कर्नाटकसह महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांचे प्रवासी ये-जा करतात. गोव्यातील नागरिकांना मराठी उत्तम प्रकारे येत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची दखल घेणे गरजेचे आहे. काही मराठी भाषिक संघटनांनी या विरोधात आवाज उठविण्याची तयारी केली असून, मराठीत फलक न लावल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.









