अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्या विजयाची नांदी

बेळगाव : बेळगाव शहरातील उत्तर मतदारसंघात मागील 25 वर्षांपासून म. ए. समितीला प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. 2008 व 2013 या दोन्हीवेळी मराठी मतांची विभागणी होवून मराठी माणसाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अनेकांनी राष्ट्रीय पक्षांची कास धरली. या काळात राष्ट्रीय पक्षांनी मराठी माणसांचा अपमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे संतापलेले मराठी भाषिक पुन्हा एकदा एकत्रित आले असून हाती समितीचा भगवा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. उत्तर मतदारसंघात मराठी भाषिकांचे प्राबल्य सर्वाधिक आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्यासारख्या एक प्रामाणिक व स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती उमेदवार म्हणून दिल्याने नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक विभागातून त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. याचबरोबर राष्ट्रीय पक्षांकडे वळलेले तरुण पुन्हा एकदा भगव्या झेंड्याखाली एकवटले आहेत. एरवी मराठीचा द्वेष करणारे राष्ट्रीय पक्ष आता मात्र मराठीचा बोलबाला करत आहेत. केवळ मराठी मतांवर डोळा ठेवून मराठीचा उदोउदो सुरू असून मराठी भाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी म. ए. समिती शिवाय पर्याय नाही.
एकीकडे कोणत्याही राजकीय पाठिंब्याविना कार्यकर्ते जोडत महाराष्ट्र एकीकरण समिती प्रचार करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातीलच राष्ट्रीय पक्षांचे नेते बेळगावमध्ये दाखल होऊन म. ए. समितीच्या विरोधातील उमेदवारांचा प्रचार करत आहेत. राष्ट्रीय पक्षांकडून हिंदुत्वाचा खोटा प्रचार केला जात असला तरी बेळगावमध्ये खरे हिंदुत्व हे मराठी भाषिकांनीच जपले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी एकच उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील निवडणुकांमध्ये समितीचे झालेले नुकसान यावेळेला भरून काढले जात आहे. राष्ट्रीय पक्षांनी मराठी भाषिक उमेदवारांना डावलल्यामुळे ही नाराजी म. ए. समितीच्या पथ्यावर पडली आहे. राष्ट्रीय पक्षातील नाराज कार्यकर्ते समितीच्या झेंड्याखाली एकत्र आल्याने अॅड. अमर येळ्ळूरकरांना हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यामुळेच बेळगाव उत्तरमध्ये दोन्ही राष्ट्रीय पक्षांना तोडीसतोड आव्हान म. ए. समितीने निर्माण केले आहे. तसेच अॅड. अमर येळ्ळूरकर यांचाच विजय होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
गल्लोगल्ली अमर येळ्ळूरकरांना पाठिंबा
अॅड. अमर येळ्ळूरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून आजतागायत त्यांना भरघोस पाठिंबा मिळू लागला आहे. काही मराठी गल्ल्यांच्या बोर्डवर फलक लावण्यात आले असून अॅड. अमर येळ्ळूरकर यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालील वाळू सरकण्यास सुऊवात झाली आहे. बेळगावमधील भातकांडे गल्ली, कंग्राळ गल्ली, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटीलमळा यासह इतर गल्ल्यांमध्येही येळ्ळूरकर यांना पाठिंब्याचे बॅनर झळकू लागले आहेत.









