शिवाजीनगर येथील प्रकार : रात्रीच्यावेळी तऊण गांजा, सिगारेट, मद्यप्राशन करत असल्याचा नागरिकांचा आरोप
बेळगाव : शिवाजीनगर येथील जेल कॉलनी शेजारी असणाऱ्या मराठी शाळा नं. 27 च्या आवारात रात्रीच्यावेळी मद्यपींचा वावर वाढल्याने शाळा परिसरात मद्याच्या बाटल्या, ट्रेटापॅक पाकिटे टाकली जात आहेत. त्यामुळे विद्येचे मंदिर असणाऱ्या शाळेला विद्रुप स्वरूप आले आहे. संबंधितांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे. मराठी शाळेला मोठे आवार असून येथे अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. याचठिकाणी अंगणवाडीही भरविली जाते. रोज सकाळ, संध्याकाळी कराटे प्रॅक्टीस करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. शाळेच्या आवारात वयोवृद्ध नागरिक वायूविहारासाठी येत असतात. त्यामुळे शाळेला मोठे महत्त्व आहे. असे असताना काही तरुणांकडून शाळेचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मद्यप्राशन करून बाटल्या शाळेच्या आवारात टाकल्या जात आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होत आहे.
रात्रीच्यावेळी याठिकाणी अनेक तरुण वावरत असतात. अंधाराचा फायदा घेत गांजा, सिगारेट, मद्यप्राशन केले जाते. असा आरोप स्थानिक नागरिकांतून केला जात आहे. तरुणांच्या बेजबाबदारपणामुळे शाळेचे विद्रुपीकरण होत आहे. अंगणवाडी असल्याने लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आदी साहित्य उभारण्यात आले आहे. मात्र त्याचीही मोडतोड करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने रात्रीच्यावेळी या भागात गस्त घालून संबंधितांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही स्थानिकांतून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी शेड उभारण्याची मागणी
शाळेच्या आवारामध्ये कराटे प्रॅक्टीससाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शिवाजीनगर परिसरातून अनेक विद्यार्थी येथे येत असतात. पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टीस करणे अडचणीचे ठरत आहे. यासाठी शेड उभारण्याची मागणी केली जात आहे.









