मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या शतकोत्तरी सुवर्णमहोत्सव सांगता कार्यक्रमात डॉ. डी. एम. पाटील यांचे मार्गदर्शन
वार्ताहर/येळ्ळूर
मराठी भाषेचा कालखंड हा 2400 वर्षांपूर्वीचा असून, ती एक स्वतंत्र प्राचीन भाषा आहे. संस्कृत-प्राकृत आणि मराठी अशी परंपरा फार वर्षे चालली पण मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून तयार झाली नसून, तिला तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ती भारताच्या प्राचीन भाषेपैकी एक आहे, असे मार्गदर्शन घाळी कॉलेज, गडहिंग्लजचे प्राचार्य डॉ. डी. एम. पाटील यांनी केले. ते मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर शाळेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शतकोत्तरी सुवर्णमहोत्सव कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. राम नांदुरकर होते. मारहट्ट-मरहट्ट आणि मराठी अशी विकसित होत गेलेल्या मराठी भाषेला कला, साहित्य आणि संस्कृतीमध्ये फार मोठे स्थान होते. सातवाहन कालिन राजाची ती राजभाषा होती.
समृद्ध परंपरा, साहित्य बरोबर विविध कालखंडात ताम्रपट, कोरीव लेख, शिल्प, संत साहित्य, पंडिती साहित्य, शाहिरी साहित्य असे बहुअंगी साहित्यांची निर्मिती झाली आहे. ज्ञानप्रसार, विचार प्रसार आणि संघटना यासाठी या भाषेचा पूर्वीपासूनच वापर होतो आहे. दुसऱ्या भाषेचा प्रभाव या भाषेने स्वीकारला नाही. आज तंत्रज्ञानामध्येही या भाषेचा वापर सुरू असून प्रसार माध्यमांनी ही भाषा स्वीकारली आहे. तर आजच्या युगात व्यवहारिक भाषा म्हणूनही तिचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आज मराठी भाषेच्या उपयोजनांची मोठी गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. राम नांदुरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कसे जगावे यावर व्यवहारिक उदाहरणे देत माहिती दिली. व्यासपीठावर रविंद्र बिर्जे, पांडुरंग मुचंडी, धनंजय जाधव, अब्दुल मुल्ला, के. सी. पाटील, शिवाजी कुगजी, बी. एम. बडीगेर, साधना बद्री, दशरथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात स्मृतींना उजाळा हा ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांसमवेत कार्यक्रम झाला.
माणुसकीची शिकवण देणारा वारकरी पंथ
रविवारच्या चौथ्या सत्रामध्ये हभप ज्ञानेश्वर संजय बंडगर महाराज सांगोला यांचे संत परंपरा व समाज प्रबोधन विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये प्रबोधनाला फार महत्त्व आहे. 500 वर्षांची परंपरा असणाऱ्या या संप्रदायाने शहाणपणा आणि सामंजस्यपणाची शिकवण देत समाजाला जागं केलं. ज्ञानेश्वर सारख्या महान संतांनी वेदांचे महत्त्व कमी करून गीतेचे महत्त्व वाढवले. या सांप्रदायाने सामाजिक समतेचा विचार मांडून तो प्रवाहीत केला. वारकरी संप्रदायाचे जाती, धर्म, वर्ण भेद न मानता माणुसकीची शिकवण देत समतेच्या विचाराला चालणा दिली. स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडून स्त्री वादाचा विचार मांडला. या संप्रदायामध्ये सर्व जाती-धर्मांच्या संतांनी वाङमय निर्मिती करून मराठी भाषा समृद्ध केली. आणि मानवतेबरोबर भूतदयाही शिकवली. वारकरी पंथ हा व्यापक चिकित्सक आणि समतावादाचा आहे. म्हणून तर वारकरी पंथाचा देव सुखाच, क्षेत्र सुखाचे आणि मार्गही सुखाचा असे सांगितले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी शशिकांत देसाई होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाची सुरुवात जशी प्रबोधन फेरीने करण्यात आली तशी याची सांगताही आपल्या रुढी, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. हा महोत्सव पार पाडण्यासाठी शाळेचे एसडीएमसी सदस्य, सर्व कमिट्यांचे अध्यक्ष व सदस्य मराठी मॉडेल शाळेचा शिक्षक वर्ग व विद्यार्थी, पालक वर्गाने मोठी मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला.









