बेळगुंदी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ उत्साहात : 11 रोजी होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी
वार्ताहर /किणये
मराठी भाषा, संस्कृती जतनाचे कार्य साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होते. त्यामुळे ग्रामीण भागात होणाऱ्या साहित्य संमेलनांना सर्व स्तरातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आज घराघरांमध्ये टीव्ही, मोबाईल व इंटरनेटचा वापर अधिक होऊ लागला आहे. या तुलनेत ग्रंथ व पुस्तक वाचन संस्कृती टिकविण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषेबरोबरच अन्य भाषाही आत्मसात करून आपला व्यक्तिगत विकास करायला हवा, असे किशोर काकडे यांनी बेळगुंदी येथे सांगितले. बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 18व्या मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम रविवारी मरगाईदेवी मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष कृष्णा गावडे हे होते. रवळनाथ मंदिर कमिटीचे अध्यक्ष प्रसाद बोकडे व प्राजक्ता बोकडे यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर आप्पाजी शिंदे व सरस्वती शिंदे यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून अशोक कांबळे हे उपस्थित होते. त्यांनी साहित्य संमेलनाबाबत सविस्तर माहिती सांगितली. रविकिरण सोसायटीचे चेअरमन म्हात्रू झंगरूचे, व्हा. चेअरमन मनोहर पाटील, मारुती चव्हाण, मोनिका आमरोळकर, तानाजी सुतार, पुंडलिक जाधव, नामदेव गुरव आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य रंजना गावडा यांच्या हस्ते रवळनाथ प्रतिमेचे पूजन करण्यात आले. धुळोबा पाटील, सुमन गावडा, कृष्णा बाचीकर, अशोक पाटील, आदींच्या हस्ते विविध देवदेवतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला बेळगुंदी परिसरातील निवृत्त मुख्याध्यापक, मुख्याध्यापक व शिक्षक आदींसह ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाचे संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण सर्व स्तरातून प्रयत्न करू, असे अनेकांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवले. रविवार दि. 11 रोजी बेळगुंदी मराठी साहित्य संमेलन होणार आहे. याची अकादमीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.









