अभिजात मराठी दृकश्राव्य कार्यक्रमात डॉ. संध्या देशपांडेंनी उलघडला इतिहास
बेळगाव : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. परंतु दोन हजारहून अधिक वर्षाचा इतिहास या भाषेला आहे. याची साक्ष नाणेघाट देतो. या नाणेघाटात बौद्धविहार, गणेश व हनुमान मूर्ती, गुहा, प्राचीन लिखावट व जकातीचे पैसे साठविण्याचा हौद पाहायला मिळतो. म्हणजेच आपल्या भाषेला मोठा इतिहास आहे. हाच इतिहास डॉ. संध्या देशपांडे यांनी ‘अभिजात मराठी दृकश्राव्य’ कार्यक्रमातून अभ्यासपूर्वक उलघडला. याची निर्मिती नाट्यांकूर थिएटरची होती. नाणेघाटापाठोपाठ हालसात वाहनाची सप्तशतीमध्ये अनेक मराठी शब्द सापडतात. राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराष्ट्री ही संस्कृतपेक्षा जुनी असल्याचा पुरावाही दिला. हा इतिहास अभिमानाने मिरवत सुरेश भट म्हणतात, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या भाषेला मौखिक साहित्याचीही परंपरा आहे. ती ओव्यांमधून पुढे येते. हे सांगताना उगवला नारायण यासह अनेक ओव्या सादर झाल्या. त्याचबरोबर ज्ञानेश्वरीतील काही ओव्या ऐकविण्यात आल्या.
चक्रधरांचे ‘लिळाचरित्र’ हा मराठीतील पहिला ग्रंथ त्यातील द्युतक्रीडा ही गोष्ट सादर केली. यातीलच काही दृष्टांत ही कथा सांगण्यात आली. धवळे व मातृकी ही मराठीतील पहिली कथाकाव्य त्याचेही सादरीकरण येथे झाले. महंदबेनी रचलेली काही कडवी ऐकविली. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे असे सांगून नामदेव, मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा यांचे काही अभंगांचे दाखले सादरकर्त्यांनी दिले. संत कवी एकनाथ यांनी भागवत संप्रदायाला कशी चालना दिली, या परंपरेचा तुकोबा कसा कळस ठरले. नंतरच्या काळात दृष्टचक्रात सापडलेल्या लोकांना समर्थांनी कशी दिशा दाखवली. याचीही माहिती आणि सादरीकरण यांच्या माध्यमातून देण्यात आली.
छत्रपती शिवराय तर आपले आराध्य दैवत, गोंधळाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना साद घातली. तो गोंधळही सादर करण्यात आला. यानंतर अनेक पंडिती परंपरांचा आढावा या कार्यक्रमात घेण्यात आला. मोरोपंतांच्या सीता-गीताचा आढावा घेतानाच त्याचे नाट्यारुप सादरीकरण झाले. एकूणच मराठी साहित्याचे हे अक्षर लेणे अत्यंत प्रभावीपणे या कार्यक्रमातून व्यक्त झाले. हा प्राचीन वाङमयाचा इतिहास बखरपर्यंत येऊन थांबतो. भाषा दुर्लभ असेल तर सुबोध करता येते. पण तिचे कुपोषण कसे थांबवायचे हा प्रश्न आहे. म्हणूनच अभिजात मराठीचे अभिजातपण टिकविण्यासाठी आपण पाऊल उचलूया आणि अवघा रंग एक झाला, असे म्हणूया या संध्या देशपांडेच्या आवाहनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. एक सांघिक आणि उत्तम असा आविष्कार यामधून व्यक्त झाला.









