बेळगाव-खानापूर-पणजी मार्गावर फलक लावण्याचे निर्देश : युवा समितीच्या प्रयत्नांना यश
बेळगाव : बेळगाव-खानापूर-पणजी या नव्या राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक केवळ कन्नड व इंग्रजी भाषेत लावण्यात आले होते. या विभागामध्ये मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक असताना मराठीला डावलण्यात आल्याने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत बेंगळूर येथील कार्यालयाने धारवाड विभागीय कार्यालयाला पत्र लिहून मराठी व कोकणी भाषेत फलक लिहिण्याच्या सूचना केल्या आहेत. बेळगाव-पणजी महामार्ग नव्याने तयार करण्यात आला. हा महामार्ग खानापूरमार्गे गोव्याला जोडण्यात आला आहे. यासाठी अनेक मराठी भाषिक शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन दिली आहे. मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक असतानाही महामार्गावर इंग्रजी व कन्नड या दोनच भाषांमध्ये दिशादर्शक फलक लावण्यात आले. यामुळे युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मराठी फलक लावण्याची विनंती केली होती. महामार्ग प्राधिकरणासह या निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही 17 फेब्रुवारी 2023 रोजी पाठविली होती. परंतु, धारवाड येथील विभागीय कार्यालयाने मराठीमध्ये फलक लावण्यास नकार दिला होता. त्यामुळे युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून 2014 साली कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ देत मराठीत फलक लावण्याची मागणी केली होती. या मागणीला आता यश आले आहे. बेंगळूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक कार्यालयाने धारवाड येथील विभागीय कार्यालयाला मराठी व कोकणी भाषेत फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दाद : – वासू सामजी (उपाध्यक्ष, म. ए. युवा समिती)
बेळगाव-पणजी महामार्गावर मराठीतून दिशादर्शक फलक लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाशी केलेल्या पाठपुराव्यामुळे लवकरच मराठी व कोकणी भाषेत फलक लावले जाणार आहेत.









