पाटील गल्ली गणेशोत्सव मंडळाचा फलक महापालिकेने हटविला : गणेशभक्त आक्रमक, रस्त्यावर उतरण्याची तयारी
बेळगाव : मराठी द्वेषाने पछाडलेल्या प्रशासनाला आता देवाच्या दरबारातही मराठीची कावीळ दिसू लागली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पाटील गल्ली येथे लावलेला फलक शुक्रवारी दुपारी महानगरपालिकेने हटविला. फलकावर कन्नडमध्ये उल्लेख नसल्याचे कारण देत फलक काढण्यात आल्याने प्रशासनाच्या या कृतीविरोधात गणेशभक्त आक्रमक झाले आहेत. याविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी गणेशोत्सव मंडळांकडून केली जात आहे. मुंबई, पुणे या मोठ्या महानगरांनंतर सर्वात मोठा गणेशोत्सव बेळगावमध्ये साजरा होतो. शतकोत्तर परंपरा लाभलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक जागृती करणारे देखावे सादर केले जातात. त्यामुळे बेळगावसह आसपासच्या भाविकांना गणेशोत्सवाची आस लागली आहे.
काही मंडळांनी यावर्षी आगमन सोहळे काढण्याचे निश्चित केल्याने त्यांच्याकडून फलकाद्वारे जागृती केली जात आहे. त्यामुळे शहराच्या बऱ्याचशा भागात गणेशोत्सवाचे फलक झळकू लागले आहेत. पाटील गल्ली येथील भगतसिंग चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बेळगावच्या लंबोदराचे स्वागत करणारा फलक शनिमंदिर कॉर्नर येथे लावला होता. सध्या भाषिक वाद उफाळून आल्यामुळे महानगरपालिकेकडून या फलकाला लक्ष्य करण्यात आले. कानडी संघटनांच्या दबावामुळे महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. फलकावर कन्नड भाषेत उल्लेख नसल्याने फलक काढला जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत गणेशोत्सवातील फलकांवर कन्नडचा उल्लेख करण्याची सूचना काही कानडी कार्यकर्त्यांनी केली होती. यापूर्वी केवळ सरकारी कार्यालयांमध्ये कन्नडसक्ती करणाऱ्या प्रशासनाने आता देवाच्या दारातही कन्नडसक्ती सुरू केल्याने प्रशासनाचा निषेध केला जात आहे.
आता गणेशोत्सवातही भाषावाद
महानगरपालिकेने पाटील गल्ली गणेशोत्सव मंडळाचा फलक शुक्रवारी हटविला. आता गणेशोत्सवातही भाषावाद आणण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे. महानगरपालिकेच्या आयुक्त तसेच पोलीस आयुक्तांनी गणेशोत्सवाच्या बाबतीत भाषावाद न करता गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन द्यावे. अन्यथा हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
– रणजित चव्हाण-पाटील









