तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार : हजारो मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : बेळगावसह संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या 15 टक्क्यांहून अधिक असतानाही येथे मराठी माणसालाच डावलण्याचा प्रयत्न होत आहे. मराठी भाषेचे अस्तित्व मिटविण्यासाठी कन्नड सक्तीचा फतवा बजावण्यात आला आहे. याविरोधात सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. या महामोर्चावेळी बेळगाव तालुक्यातून हजारो मराठी भाषिक उपस्थित राहून मराठी अस्मितेसाठीची एकी दाखवतील, असा विश्वास तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. रविवारी तालुका म. ए. समितीची महत्त्वाची बैठक मराठा मंदिर येथे पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. व्यासपीठावर सचिव अॅड. एम. जी. पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले उपस्थित होते. या बैठकीमध्ये तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत महामोर्चा यशस्वी करण्यासंदर्भात मते मांडली. कर्नाटक सरकारकडून नवनवीन फतवे काढून मराठी संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी कार्यालयातील मराठी फलक हटविण्यात आले. त्यानंतर दुकानांवरील पाट्या व आता गणेशोत्सवाच्या फलकांवरही कन्नड सक्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता ही कन्नड सक्ती प्रत्येकाच्या दारासमोर येऊन ठेपल्याने वेळीच आवाज उठविणे गरजेचे आहे. अन्यथा घरातही मराठी बोलण्यावर यापुढे निर्बंध येतील, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
केवळ म. ए. समितीचाच फलक असेल
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सोमवारी होणाऱ्या मोर्चाला सर्व संघटना, पक्ष, संस्थांमधील मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. परंतु, या मोर्चामध्ये केवळ म. ए. समितीचा फलक असेल. इतर कोणत्याही संघटनेने फलक आणून संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन करण्यात आले. बैठकीमध्ये बी. डी. मोहनगेकर, अनिल पाटील, मनोहर हुंदरे, रामचंद्र मोदगेकर, विलास घाडी, आर. एम. चौगुले यांनी मते मांडली.
वेळीच जाब विचारा
सध्या ग्राम पंचायतींमध्ये मराठीतून निवेदन अथवा अर्ज स्वीकारले जात नसल्याची तक्रार येत आहे. तसे घडल्यास संबंधित पीडीओकडून लेखी उत्तर घ्यावे. त्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्यास योग्य होईल. तसेच कोणत्याही कन्नड संघटनेने दुकानांवरील फलक काढण्यास सांगितले तर त्यांना जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन मनोहर किणेकर यांनी केले.









