मराठी भाषिकांतून संताप : विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला : उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
प्रतिनिधी/ बेळगाव
प्राध्यापक होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या के-सेट परीक्षेमधून मराठी विषयाला वगळण्यात आले आहे. यामुळे बेळगाव, धारवाड व गुलबर्गा येथे मराठी विषयातून एमए केलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. एकीकडे कर्नाटक सरकारकडून कन्नडसक्ती सुरू असतानाच दुसरीकडे के-सेटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेतून मराठीला डावलण्यात आल्याने विद्यार्थ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी मराठी भाषेतून एमए करीत आहेत. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी के-सेट परीक्षा गरजेची आहे. यामुळे दरवर्षी शेकडो विद्यार्थी मराठी विषयातून परीक्षा देत असतात. कर्नाटक परीक्षा मंडळाने शुक्रवारी के-सेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. इच्छुक विद्यार्थ्यांना 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु परीक्षा मंडळाने विषयाच्या यादीतून मराठी वगळल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांना बसला धक्का
सध्या बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठासह गुलबर्गा व धारवाड या विद्यापीठांमध्ये अंदाजे 2 हजार विद्यार्थी मराठी विभागातून एमए, तसेच पीएचडी करत आहेत. हे विद्यार्थी पुढे प्राध्यापक होण्यासाठी के-सेट परीक्षा जाहीर होण्याची वाट पाहत होते. परंतु मराठीला वगळण्यात आल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना धक्का बसला. जाणीवपूर्वक माराठीला वगळण्यात आले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कन्नडसक्तीमुळे मराठीचा मुद्दा गाजत असतानाच परीक्षा मंडळाने सुरू केलेल्या या भाषा भेदाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तीन विद्यापीठांमध्ये मराठी विभागाद्वारे शिकविले जात असतानाही परीक्षेतून वगळण्यात आले. परंतु म्युझिक, ऊर्दू यासारखे विभाग नसतानाही त्यांना परीक्षेत स्थान देण्यात आले आहे. परीक्षा मंडळाच्या या अनागोंदी कारभाराविरोधात आता नाराजी व्यक्त होत असून परीक्षा मंडळाने तात्काळ मराठीचा समावेश करावा, अशी मागणी केली जात आहे.
म. ए. युवा समिती आक्रमक…
के-सेट परीक्षेतून मराठीला वगळल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. सोमवार दि. 25 रोजी सकाळी 11.30 वाजता याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आवाज उठविला जाणार आहे. यावेळी मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.









