नोटिसा कन्नड-इंग्रजीमधूनच : 16 रोजी बैठक
बेळगाव : महापालिकेची सर्वसाधारण बैठक दि. 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. या बैठकीच्या नोटिसा पुन्हा कन्नड आणि इंग्रजीमधून देण्यात आल्या. त्यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांनी त्या नोटिसा स्वीकारल्याच नाहीत. महापौरांनी आश्वासन देऊनही पुन्हा अशाप्रकारे नोटिसा देण्यात आल्याने मराठी भाषिक नगरसेवकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेमध्ये यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकांनी मराठीमधून नोटिसा द्याव्यात, अशी मागणी केली होती. त्यावेळी महापौर शोभा सोमणाचे यांनी पुढील बैठकीच्या नोटिसा तिन्ही भाषांतून दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. सत्ताधारी पक्षातीलच नगरसेवकांनी फुशारकी मारत मराठीतून नोटिसीची मागणी केली होती. मात्र ती मागणी फेटाळल्यामुळे सत्ताधारी पक्षातील मराठी नगरसेवकांच्या मागणीला कवडीचीही किंमत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. मनपा सभागृहामध्ये सर्वात जास्त मराठी भाषिक नगरसेवक आहेत. त्यांना कन्नड आणि इंग्रजी भाषा समजणे अवघड आहे. बैठकीचा अजेंडाच माहीत नसल्यामुळे कोणते प्रश्न विचारायचे अवघड झाले आहे. भाषिक राजकारण नको, असे म्हणत नगरसेवकांनी मागील बैठकीमध्ये फुशारकी मारत हा प्रश्न मांडला होता. मात्र त्यांची फुशारकी हवेतच विरली आहे. सर्वसाधारण बैठक 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचदिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे बैठकीला अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मराठी नगरसेवक या प्रकारामुळे कोणती भूमिका घेणार, हे पहावे लागणार आहे.









