मराठी भाषिकांतून तीव्र संताप : महापालिकेत सर्वत्र कानडीकरण
बेळगाव : महापालिकेत सर्वत्र कानडीकरण करण्यात आल्यानंतर महापौर, उपमहापौरांच्या सरकारी वाहनांवरील मराठी फलकदेखील हटविण्यात आले आहेत. केवळ कानडी भाषेतील फलक व नंबरप्लेट बसविण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त शुभा बी. यांना मराठीचे वावडे झाले असल्याने त्यांनी सर्वत्र कानडीकरण केले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून त्यांच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी बेळगाव मनपाचा पदभार स्वीकारल्यानंतर कन्नडलाच प्राधान्य दिले आहे. अधिकाऱ्यांना सर्वत्र कन्नडसक्ती करण्याची सूचना त्यांनी केली असल्याने अधिकारी शहरातील व्यापारी आस्थापनाबाहेरील मराठी भाषेतील नामफलक हटवत आहेत. मराठी फलक काढण्यात आल्यानंतर 60 टक्के जागेत कन्नड भाषेत फलक लावण्यात यावेत तर उर्वरित 40 टक्के जागेत अन्य भाषेतील अक्षरे लिहावीत, असा सल्ला दिला जात आहे.
अलीकडेच महापालिकेच्यावतीने ए व बी खात्यांचे वितरण करताना लाल व पिवळ्या रंगाचे पेपर देण्यात येत आहेत. ए खात्यासाठी पिवळा कागद तर बी खात्यासाठी लाल कागद दिला जात असल्याने कन्नड ध्वजाप्रती मनपा आयुक्तांचे असलेले प्रेम दिसून येते. सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी काही दिवसांपूर्वी शासकीय कार्यालयात कन्नड भाषेलाच प्राधान्य द्यावे, असा आदेश जारी केल्यानंतर महापालिकेत सर्वत्र कानडीकरण करण्यात आले आहे. तिन्ही भाषांतील फलक यापूर्वी महापालिकेत लावण्यात आले होते. मात्र, इंग्रजी व मराठी भाषेतील अक्षरे हटवून केवळ फलकच लावण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून महापौर व उपमहापौरांच्या शासकीय वाहनांवर मराठी व इतर भाषेतील नामफलक होते. सदर फलकही आता महापालिकेच्या डोळ्यात खुपले आहेत. महापौर, उपमहापौरांच्या वाहनांवरील मराठी भाषेतील फलक हटविण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता केवळ कन्नड भाषेतील फलक लावण्यात आले असून वाहनांचे नंबरही कन्नडमध्येच घालण्यात आले आहेत.
वर्चस्वासाठी प्रयत्न…
बेळगाव शहर व जिल्ह्यात मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. येथील सर्व व्यवहार मराठीतूनच चालतात. मात्र, बेळगाववर कर्नाटकचे वर्चस्व आहे, असे भासविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.









