फलक काढण्याची मागणी
बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मादेवीच्या दर्शनासाठी कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेशातील हजारो भाविक येतात. यामध्ये सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रातील भाविकांची असते. रविवार दि. 15 रोजी यल्लम्मा डोंगरावर कोल्हापूरच्या भाविकांची यात्रा होणार असल्याने स्थानिक आमदारांनी या ठिकाणी भाविकांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. परंतु, नेहमीच भाषावादाने पछाडलेल्या काही कानडी संघटनांना हे फलक खुपू लागले आहेत. मराठीतील हे फलक काढण्याची विनंती प्रशासनाकडे केली जात असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाविकांच्या स्वागतासाठी कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर बॅनर्स लावले आहेत. परंतु, यावरूनही भाषावाद उकरून काढण्याचा प्रयत्न कानडी संघटना करत आहेत. महाराष्ट्रातील भाविक उद्या होणाऱ्या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने या ठिकाणी बॅनर लावले जातात. प्रत्येक वर्षी हे बॅनर लावले जातात. परंतु, यावर्षी बॅनरला विरोध होत आहे. स्थानिक नागरिकांचा कुठेही विरोध नसताना बाहेरील नागरिक यात्रेचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. किमान देवाच्या दारात तरी भाषावाद दूर ठेवावा, असा सल्ला मराठी भाषिकांमधून दिला जात आहे. एरवी प्रत्येक घटनेला भाषावादाचे रूप देणाऱ्या कानडी संघटनांनी किमान यात्रांवेळी तरी असे काही तरी उकरून वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
यात्रा उत्साहात पार पाडणे गरजेचे
कोल्हापूर, सांगली या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अनेक मंदिरांमध्ये कर्नाटकातील भाविक ये-जा करीत असतात. त्यावेळी स्वागतासाठी कन्नड फलक लावले जातात. विशेषत: सांगली जिल्ह्यात होणाऱ्या यात्रांसाठी कन्नड फलक चालतात. मग सौंदत्ती येथील यात्रेत मराठी फलक लावला म्हणून काय बिघडले? त्यामुळे कानडी संघटनांनी असा वाद उकरून न काढता यात्रा उत्साहात पार पाडणे गरजेचे आहे.









