जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा : बेळगावमधूनही भर पावसातही शेकडोंची उपस्थिती
बेळगाव : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाही बेळगावमधील मराठा समाजाने मूक मोर्चा काढून रविवारी आपली ताकद दाखवली. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो मराठा एकत्र आले. भगव्या टोप्या, झेंडे, शेले यामुळे सर्व परिसर भगवेमय झाला होता. मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवून मराठा समाजाने आपली एकी दाखवून दिली. बेळगाव सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी उद्यानापासून सकाळी मूक मोर्चाला सुरुवात झाली. प्रारंभी मोर्चाचे संयोजक प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, नेताजी जाधव, अॅड. अमर यळ्ळूरकर, नगरसेवक रवी साळुंखे, सुनील जाधव यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर एसपीएम रोड मार्गे मोर्चाला प्रारंभ झाला.
मोर्चाच्या अग्रभागी छ. शिवाजी महाराजांची मूर्ती
मोर्चाच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली होती. मूक मोर्चा असल्यामुळे आरक्षण मिळालेच पाहिजे, असे फलक घेऊन बेळगावसह खानापुरातील नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सुरुवातीला मराठा बांधवांची संख्या कमी होती. पण मोर्चा जसजसा पुढे सरकत होता तसतशी गर्दी वाढत गेली.
भरपावसातही शेकडोंची उपस्थिती
रविवारी सकाळपासूनच शहरासह तालुक्यात पावसाचे वातावरण होते. त्यामध्येच साप्ताहिक सुटी असल्याने अनेक मंडळांचे महाप्रसाद होते. मोर्चाला मराठा बांधव उपस्थित राहणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, सकाळी 11 नंतर भरपावसातही शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव छत्रपती शिवाजी उद्यानात उपस्थित होते. छत्रपती संभाजी चौक येथे भाषणावेळी जोरदार पाऊस सुरू झाला. परंतु, तेथून न हलता मराठा बांधवांनी आपली एकी दाखवून दिली.
पाठिंबा दर्शवून महाराष्ट्रातील मराठा समाजाचे बळ वाढवले
धर्मवीर संभाजी चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मोर्चाची सांगता झाली. यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, मराठा समाज हा अल्पभूधारक असून शेतीवरच त्यांचे कुटुंब चालते. हा समाज शिक्षणामध्ये मागास राहिल्यामुळे सरकारी नोकऱ्या नाहीत. विविध प्रकल्प आणून त्यांच्या जमिनीही हिरावल्या जात आहेत. त्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला बेळगावमधील मराठा समाजाने पाठिंबा दर्शवून महाराष्ट्रातील मराठा समाजाचे बळ वाढवले आहे.
दलित बांधवांचाही पाठिंबा
आजवर मराठा समाज नेहमीच दलित बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आता मराठा समाज अडचणीत असून, त्यांना बळ देण्यासाठी दलित बांधव खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सहभागी होतील, असे आश्वासन दलित संघर्ष समितीच्या महांतेश तळवार यांनी दिले. समितीचे प्रदेश सदस्य सिद्धाप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक दलित कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर कर्नाटक दलित युवा संघटनेचे मोहन कांबळे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.









