सातारा :
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या ऐतिहासिक व सकारात्मक निर्णयाचे सातारा शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता शिवतीर्थ परिसर घोषणांनी दुमदुमला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून “एक मराठा, लाख मराठा“ अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला.
यावेळी मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या, तर काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. कार्यकर्त्यांनी या निर्णयामुळे दीर्घकाळ चाललेल्या लढ्याला न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
या जल्लोषात शरद काटकर, शरद जाधव, बापू क्षीरसागर, अॅड. शिर्के, बंडू कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मराठा आरक्षण प्रश्नी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विशेष आभार मानण्यात आले. “सरकारचा निर्णय हा न्यायाचा विजय असून मराठा समाजाच्या एकतेचे हे फळ आहे,“ असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.








