छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलाचे 11 रोजी हल्याळ येथे भूमिपूजन
खानापूर : गुरुकुलच्या माध्यमातून राष्ट्राची भावी पिढी उभारली जाऊ शकते. यासाठी मराठा समाजाचे गुरुकुल उभारणे महत्त्वाचे आहे. या गुरुकुलातून देशासाठी नेते, शास्त्रज्ञ, शिक्षक, तत्त्वज्ञानी, मार्गदर्शक निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत गुरुकुलाचा महत्त्वाचा वाटा असे. यासाठी राज्य पातळीवरील मराठा समाजाचे छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल उभारण्यात येणार आहे. या गुरुकुलाचे भूमिपूजन दि. 11 फेब्रुवारी रोजी हल्याळ येथे करण्यात येणार आहे, असे मंजुनाथ स्वामी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या पत्रिकेचे वितरण करण्यासाठी मराठा समाजाचे गुरु मंजुनाथ स्वामी यांनी खानापूर येथील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मराठा समाजाच्या बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पंडित ओगले यांनी स्वागत केले.
स्वामी पुढे म्हणाले, कोणत्याही व्यक्ती आणि संस्थेच्या वाटचालीत संबंधित समाजाचे पाठबळ महत्त्वाचे असते. समाज पाठीशी राहिला तर यश मिळवता येते. मराठा समाजाला अधिक संघटित करून सर्वोन्नतीच्या दिशेने नेण्यासाठी समाजप्रमुखांनी पुढाकार घ्यावा, पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी वेळ देण्याची आणि विचार करण्याची गरज आहे. या कार्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांचे सहकार्य लाभत आहे. समाजावर माझा मोठा विश्वास असून भविष्यातील अनेक पिढ्यांना आदर्श विचारांची शिकवण देणारे गुरुकुल समाजाचे ऊर्जा केंद्र म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल, लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील, देमाण्णा बसरीकट्टी, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, किरण येळ्ळूरकर, लक्ष्मण झांजरे, शंकर पाटील, लक्ष्मण बामणे, विनोद पाटील, बाबुराव देसाई, विनायक मुतगेकर, वसंत देसाई, बाळासाहेब सावंत आदी उपस्थित होते.









