Jalna Lathi Charge : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ कसबा बावडा सकल मराठा समाजातर्फे भगवा चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचं’ मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्यांचा निषेध असो, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलिसांचे निलंबन करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.यापुढे मराठा समाज गप्प न बसता रान पेटवेल असा इशाराही देण्यात आला. कसबा बावड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आंदोलनाला पाठिंबा दिला.
या आंदोलनात मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक,शशिकांत पाटील यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भगव्या चौकात शाहूपुरी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. काही काळ येथील वाहतूक ठप्प झाली होती.









